सुट्टीच्या हंगामात दुकान मालकांकडून ग्राहकांची राजरोस लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 10:08 PM2019-05-19T22:08:11+5:302019-05-19T22:08:36+5:30
उन्हाळी सुट्टीच्या हंगामात कुटुंबीयांसमवेत पर्यटनाला बाहेर पडलेल्या प्रवाशांची महामार्गावरील मॉल्स व हॉटेल्समधून राजरोसपणे लूट सुरू आहे.
- जमीर काझी
मुंबई : उन्हाळी सुट्टीच्या हंगामात कुटुंबीयांसमवेत पर्यटनाला बाहेर पडलेल्या प्रवाशांची महामार्गावरील मॉल्स व हॉटेल्समधून राजरोसपणे लूट सुरू आहे. बिसलेरीच्या पाण्याची बाटल्या आणि खाद्यपदार्थ, स्रॅकची पॅकेट्स अव्वाच्या सव्वा दराने ग्राहकांच्या माथ्यावर मारले जात आहेत. त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी कार्यरत असलेला वैद्यमापन शास्त्र विभागाचा कारभार अधिका-याविना केवळ कागदावरच कार्यरत राहिला असल्याचे चित्र आहे.
शॉप, दुकान, पेट्रोल पंप आदी ठिकाणी नियमित पाहणी करण्यासाठी निरीक्षक वर्गच अस्तित्वात नाही. त्यामुळे एका एका अधिका-याकडे तीन -तीन जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याने त्यांची अवस्था ‘न घरका न घाटका’ अशी बनली आहे. त्यामुळे प्रामाणिक अधिका-यावर कामाचा अतिरिक्त ताण तर कमाई करणा-याकडून ‘मेवा’ खाण्याचा प्रकार सुरु आहे. अस्थापनाची पाहणी करण्यापेक्षा दरमहा ‘दर’ निश्चित करुन घेत ग्राहकांच्या लुटमारीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या विभागाकडील निरीक्षकाची २८८ पैकी तब्बल ६७ पदे अनेक वर्षापासून रिक्तच आहेत. तर सहाय्यक नियत्रकांची सध्या १५ पदे रिक्त असून येत्या महिन्या अखेरीस त्यामध्ये आणखी दोघांची भर पडणार आहे.
अन्न व औषध विभागाच्या अखत्यारित कार्यरत असलेले वैधमापन शास्त्र विभागाची अपु-या मनुष्यबळामुळे दिवसोदिवस बिकट अवस्था होत चालली आहे. एकीकडे उत्पादन व विक्री करणाºया दुकांनाची संख्या वाढत असताना त्यावर नियंत्रणासाठी कोणी वालीच नसल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. खाद्य पदार्थाचे सीलबंद पॅकेट्स,बिसलरीच्या बाटल्या व अन्य वस्तूच्या विक्री करणाºया अस्थापनावर नियंत्रण ठेवण्याचे काम या विभागाचे असते. त्यासाठी महसुल वर्गाप्रमाणे त्याचे सात विभाग करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये नियंत्रकाचे (कंट्रोलर) पद हे अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाºयाकडे असून त्यांच्याकरवी पूर्ण विभागाचे नियंत्रण चालविले जाते. त्यांच्यानंतरची विभागवार सात उपनियंत्रक कार्यरत असलेतरी प्रत्यक्षात ‘फिल्ड’वरची कामे करणाºया सहाय्यक नियंत्रक व निरीक्षक पदाचा वाणवा पडला आहे.
दोन्ही पदासाठी अनुक्रमे ४६ व २८८ पदे मंजूर असलीतरी सध्या केवळ ३१ व २११ पदे पुर्ण राज्यात कार्यरत असल्याची माहिती विभागातील सूत्रांकडून देण्यात आली. दोन्ही ठिकाणी अनुक्रमे १५ व ६७ पदे रिक्त असून अधिकाºयांच्या निवृत्तीप्रमाणे दरवर्षी त्यामध्ये वृद्धी होत राहिली आहे. त्यामुळे एका एका अधिकाºयाकडे नियमित पदाशिवाय अन्य दोन-दोन, तीन-तीन ठिकाणचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे प्रामाणिक अधिकाºयावर कामाचा अतिरिक्त ताण तर कमाई करणाºयाकडून ‘मेवा’ खाण्याचा प्रकार सुरु आहे.
-------------------
अशी चालते ग्राहकांची लुटमार
सुट्टीच्या हंगामामुळे महामार्गावरील हॉटेल्स, दुकानाच्या ठिकाणी ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. याठिकाणी १४ रुपयाची बिसलरीची बाटली १८ ते २० रुपयांना विकली जात आहे. शीतपेय आणि फुड पॅकेट्सही छापील किंमतीपेक्षा सरासरी ४ ते ८ रुपये अधिक दराने विकले जात आहेत. दराच्या तफावतीबाबत दुकानचालकाकडे विचारणा केल्यास ‘ या दरात तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या किंवा घेवू नका,’असे उद्धटपणे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांना गरजेपोटी नाईलाजास्तव जादा दराने वस्तू खरेदी करावे लागते. काही मॉल्स व हॉटेलच्या परिसरात वैधमापन विभागाकडून वस्तू विक्रीबाबतचे फलक लावले असून तक्रारीसाठी संपर्क क्रमांक दिला आहे. मात्र त्या क्रमाकांवर कॉल केल्यानंतर कार्यवाही तर दूरच काहीच प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे विनाकारण वेळ वाया जात असल्याने नागरिकही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची परिस्थिती आहे.
------------------
पांण्डेय, सानप यांच्या कारवाईचे स्मरण
वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रकाने जर मनात आणले तर लुटमार करणाºया अस्थापनावर वचक बसतो. साडेतीन, चार वर्षापासून तत्कालिन नियंत्रक संजय पांण्डये यांनी नियमांची पायमल्ली करणाºयावर धडाकेबाज कारवाई करुन बेशिस्त मॉल, शॉपवर मोठी दहशत बसविली होती. त्यांच्यापूर्वीही डॉ. माधवराव सानप यांनी नियमबाह्य अस्थापनावर कारवाईचा बडगा उगारला होता. ग्राहकांना आता त्यांच्या कारर्किदीचे स्मरण होत आहे.