पिठात दागिने लपवून झाेपले, तरी चाेरटे भलतेच हुशार निघाले; रोकडसह लाखांचे दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 10:16 PM2023-07-08T22:16:30+5:302023-07-08T22:17:09+5:30
... मात्र चोरटे भलतेच हुशार निघाले आणि शेतकरी महिलेची भीती खरी ठरवली.
सोलापूर : पंढरपूर तालुक्यात बार्डी येथील वाफळकर वस्तीवर कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोख ५० हजारांसह लाख रुपयांचे दागिने पळविल्याची घटना शनिवारी सकाळी निदर्शनास आली. विशेषत: रात्री शेतकरी महिलेने चोरीच्या भीतीने हे दागिने आणि रोकड पिठाच्या डब्यात लपवून ठेवले होते. मात्र चोरटे भलतेच हुशार निघाले आणि शेतकरी महिलेची भीती खरी ठरवली.
या घटनेनंतर शेतकरी सुदाम वसेकर यांनी पोलिसात धाव घेतली असून ८ जुलै रोजी शनिवारी मध्यरात्री ही चोरी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिस सूत्राकडील माहितीनुसार सुदाम वसेकर हे शेतकरी कुटुंब असून ते भाजीपाला पिकवतात. दिवसभर काढलेला भाजीपाला घेऊन सुदाम बाहेरगावी विकायला गेले. त्यांच्या पत्नीने चोरीच्या भीतीने आणि घरी पती नसल्याने रोकड आणि दागिने डब्यातील पिठात लपवून ठेवले. त्यानंतर त्या खोलीला कुलूप लावून दुसऱ्या खोलीत झोपी गेल्या.
हीच संधी साधून चोरट्यानी बंद खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे कुलूप तोडून दहा ग्रॅम सोन्याचे गंठण, दहा ग्रॅम कानातील झुबे व रोख पन्नास हजार रुपये असा एकूण एक लाखांचा ऐवज लंपास केला आहे.