अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये चोरीची योजना; तामिळनाडूतील गँग पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 09:39 PM2024-03-15T21:39:36+5:302024-03-15T21:39:44+5:30
गुजरात पोलिसांनी राजधानी दिल्लीमधून पाच जणांना 8 लाख 62 हजार रुपयांच्या रोकड आणि इतर वस्तूंसह अटक केली आहे.
Gujarat Crime: काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग इव्हेंट पार पडला. या सोहळ्यात जबरी चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या एका गँगच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. राजकोट शहर गुन्हे शाखेने तामिळनाडूच्या ‘त्रिची गँग’मधील पाच जणांना दिल्लीतून 8 लाख 62 हजार रुपयांच्या रोकड आणि वस्तूंसह अटक केली आहे. ही गँग जामनगरमध्ये चोरीच्या उद्देशाने पोहचली होती, पण कडेकोट सुरक्षा पाहून चोरीची योजना रद्द केली.
राजकोट शहर पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले की, त्रिची टोळीतील सर्व सदस्य तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. अंबानी कुटुंबीच्या सोहळ्यात जबरी चोरी करण्याचा टोळीचा डाव फसला. त्यानंतर या टोळीने गुजरातमधील विविध शहरांमध्ये छोट्या-मोठ्या चोऱ्या केल्या. आधी जामनगर बसस्थानकावर कारची काच फोडून लॅपटॉप आणि रोख रक्कम चोरली, त्यानंतर राजकोट आणि दिल्लीतही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्या.
सीसीटीव्ही फुटेजवरून टोळीचा सुगावा लागला
2 मार्च रोजी आरोपींनी राजकोटमध्ये मर्सिडीज कारची काच फोडून 10 लाखांची रोकड, लॅपटॉप आणि कागदपत्रांसह 11 लाख 50 हजार रुपयांचा माल चोरून नेला होता. या घटनेबाबत स्थानिक पोलिस आणि राजकोट गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. याअंतर्गत काही संशयास्पद व्यक्तींची माहिती मिळाली. यानंतर गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या इतर चोऱ्यांबद्दल माहिती दिली.
या प्रकरणी राजकोट गुन्हे शाखेच्या पथकाने 43 वर्षीय आरोपी जगन अगामुडियार, 36 वर्षीय दीपक अगामुडियार, 27 वर्षीय गुंशेकर, 62 वर्षीय मुरली मोडलियार आणि 55 वर्षीय आगमराम कातन मुत्रयार यांना दिल्लीतून अटक केली आहे. टोळीचा मास्टर माईंड मधुसूदन उर्फ व्हीजी याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी पकडलेल्या टोळीवर यापूर्वी मुंबई, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि केरळमध्ये चोरीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.