यू-ट्युबवर पाहून टाकला दरोडा; पिस्तुलासाठी दरमहिना बाजूला ठेवायचा तीन हजार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 05:37 AM2021-12-31T05:37:05+5:302021-12-31T05:37:18+5:30
Crime News : गोळीबारातील मुख्य आरोपी धर्मेंद्र यादव हा गेल्या सात महिन्यांपासून दरोड्याची तयारी करत होता.
मुंबई : कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी आरोपीला दरोड्याचे ‘परफेक्ट प्लॅनिंग’ करायचे होते. त्यानुसार त्यांनी ‘यू-ट्यूब’वर ‘हाऊ टू कमीट रॉबरी’ याचे बरेच व्हिडिओ पाहिले. तसेच शस्त्र खरेदीसाठी कामातून मिळालेला पैशांचा वापर केल्याचे तपासात उघड झाले आहे.
गोळीबारातील मुख्य आरोपी धर्मेंद्र यादव हा गेल्या सात महिन्यांपासून दरोड्याची तयारी करत होता. त्याने केटरिंगच्या कामातून मिळालेल्या मेहनतीच्या कमाईतील तीन हजार रुपये बाजूला काढले आणि चाळीस हजार जमल्यावर बिहारच्या मुंगेरमधून पिस्तूल विकत घेतले. त्यानंतर दहिसरच्या पूर्व पश्चिम परिसरात असलेल्या अनेक बँकांची रेकी केली. त्यात त्याला एसबीआयची दहिसर शाखा सोपी असल्याचे लक्षात आले.
कारण या बँकेत गार्ड नाही तसेच जवळपास जास्त सीसीटीव्ही नाहीत. रेल्वेचा ब्रीज जवळच असल्याने सहज पळणे शक्य होईल. त्यानंतर त्याने यू-ट्यूबवर दरोड्याबाबतचे व्हिडिओ पाहिले.
अखेर ‘कानून के लंबे हाथ’ त्यांच्यापर्यंत पोहोचले
दरोडा टाकायला तो बरोबर ३ वाजून १२ मिनिटांच्या सुमारास भावासोबत घरातून निघाला आणि दरोडा टाकून ३ वाजून २९ मिनिटांनी बँकेबाहेर पडत घर गाठले. गुरुवारी ते गावी पळण्याच्या तयारीत होते अवघ्या आठ तासांत ‘कानून के लंबे’ हाथ त्यांच्यापर्यंत पोहोचले. हल्ल्यासाठी वापरलेले पिस्तूल आणि दरोड्याच्या एकूण रकमेपैकी २ लाख ५ हजार पोलिसांनी हस्तगत केले असून उरलेली रक्कम त्यांनी नातेवाइकांना पाठविल्याची माहिती आहे.