परदेशी नागरिकांना चुना लावणाऱ्या रॉबिन हुड्डला गोव्यात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 09:01 PM2018-10-08T21:01:37+5:302018-10-08T21:02:19+5:30
राॅबीन हुड्ड उर्फ ग्रीन व्हेल असं या आरोपीचं नाव आहे. त्याने आझाद मैदान परिसरात २ परदेशी नागरिकांना फसवल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मुंबई - मुंबई पाहण्यासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांना ठगवणाऱ्या गोव्यातील एका सराईत आरोपीला आझाद मैदान पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राॅबीन हुड्ड उर्फ ग्रीन व्हेल असं या आरोपीचं नाव आहे. त्याने आझाद मैदान परिसरात २ परदेशी नागरिकांना फसवल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून परदेशी पर्यटक फिरण्यासाठी येतात. बहुतांश परदेशी नागरिक हे आझाद मैदान, कुलाबा, मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात फिरत असतात. त्यांच्यासाठी मुंबईही नवीनच असते. राॅबीन हा उच्चशिक्षीत असून तो इंग्रजी बोलण्यात फारच हुशार आहे. शिवाय त्याचा पेहराव देखील परदेशी नागरिकांसारखाच असतो. याच संधीचा फायदा घेऊन राॅबीन परदेशी नागरिकांना गाठायचा. आपण देखील परदेशातून आलो असून आपले पैसे संपले आहेत किंवा एकाने आपल्याला लुटलं असून परदेशातून पैसे मागवण्यासाठी मदत करा, असं म्हणत परदेशी नागरिकांना मदतीचं आवाहन करायचा, अशी होती रॉबिनची मोडस ऑपरेंडी.
परदेशात पासपोर्टवरील नंबर शिवाय पैसे वळवले जात नाही. त्यामुळे राॅबीन ओळख झालेल्या इतर परदेशी नागरिकांच्या पासपोर्टच्या मदतीने दुसऱ्याच फसवलेल्या परदेशी नागरिकाकडूनपैसे स्वतःच्या खात्यावर वळवायचा. घेतलेले पैसे काही तासांमध्ये परत करण्याची बतावणी करून निर्जनस्थळी परदेशी नागरिकांना उभं करून तेथून फरार व्हायचा. अशा प्रकारे त्याने २०१६ मध्ये एका परदेशी नागरिकाला लाखो रूपयांना फसवलं होतं. तर ३० सप्टेंबर रोजी त्याने चीनहून आलेल्या एका वृद्ध परदेशी नागरिकाला सीएसटीएम येथे ६० हजार रुपयांना फसवलं होतं. या परदेशी नागरिकाने आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी पैसे जमा झालेल्या खात्याचा माग काढत राॅबीनला गोव्यातून अटक केली आहे.