फोटोत गालावर Kiss चे निशाण आढळले म्हणून केली हत्या, ३६ दिवसांनंतर असा सापडला आरोपी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 12:31 PM2022-12-08T12:31:45+5:302022-12-08T12:32:41+5:30
कानपूरमधील चर्चेचा विषय ठरलेल्या रोनिल हत्याकांडाचा ३६ दिवसांनंतर पर्दाफाश झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कानपूर-
कानपूरमधील चर्चेचा विषय ठरलेल्या रोनिल हत्याकांडाचा ३६ दिवसांनंतर पर्दाफाश झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रोनिल नावाच्या तरुणाची हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. रोनिल याची कोचिंग क्लासमध्ये त्याच्यसोबत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीसोबत मैत्री होती आणि तो तिला बहिणीसमान मानत होता. पण विद्यार्थीनीचा प्रियकर विकास यादव याला हे नातं अजिबात मान्य नव्हतं. रोनिल याचे आपल्या प्रेयसीसोबत संबंध आहेत असा संशय प्रियकर विकास याला होता.
मृत रोनिल हा श्याम नगरच्या विरेंद्र स्वरुप शाळेतील विद्यार्थी होता. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी शाळे सुटल्यानंतर तो घरी परतला नव्हता. १ नोव्हेंबर रोजी रोनिल याचा मृतदेह श्यामनगरच्या झुडपात आढळून आला होता. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली होती.
दरम्यान, रोनिलच्या हत्याऱ्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी स्थानिकांनी कँडल मार्च देखील काढला. तसंच कुटुंबीयांच्या मागणीनुसार पोलीस कमीश्नरांनी याप्रकरणाच्या उघड चौकसीसाठी सीबीआयकडे प्रकरण सोपवण्याची मागणी करणारं पत्र उत्तर प्रदेश सरकारला दिलं होतं. याकाळात पोलिसांनीही आपली चौकशी सुरूच ठेवली होती. पोलिसांनी ३७ दिवसांमध्ये शाळेतील ३६ हून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थींनीची याप्रकरणी चौकशी केली. यात विद्यार्थीनीचा प्रियकर विकास यादव याचाही समावेश होता.
पोलिसांनी बंगळुरूहून सायबर एक्स्पर्ट टीमला बोलावून रोनिलच्या मोबाइलमधील व्हॉट्सअॅप चॅट रिकव्हर केले. त्यानंतर यासंपूर्ण प्रकरणाचा गुंता सुटत गेला. ज्या विद्यार्थीनीला रोनिल आपली बहिण मानत होता तिच्याशीच संबंधित प्रकरणामुळे त्याची हत्या झाल्याचं ज्वाइंट कमिन्शर आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितलं.
रोनिल आणि आपल्यात प्रेमसंबंध नाहीत हे प्रियकर विकास यादव याला पटावं यासाठी विद्यार्थीनीनं तिच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर रोनिलला राखी बांधतानाचा फोटो देखील ठेवला होता. तरी विकास यादवला विश्वास बसला नाही आणि त्यानं रोनिलला याप्रकरणी चर्चा करण्यासाठी एकट्याला श्यामनगर येथे एका निर्मनुष्य ठिकाणी बोलावलं.
दोघांमध्ये संभाषण सुरू असतानाच रोनिलच्या खिशातून विकासच्या प्रेमिकेचा फोटो बाहेर पडला. त्यात रोनिल त्याच विद्यार्थीनीसोबत दिसत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर लिपस्टिकचा डाग होता. हे पाहून विकास भलताच संतापला आणि त्यानं रोनिलला धक्का दिला. रोनिल खाली पडला आणि विकासनं त्याचा गळा आवळून खून केला.
पोलिसांनी विकास यादव याला तीनवेळा बोलावून चौकशी केली. पण आयआयटीमध्ये शिक्षण घेणारा विकास यादव इतका चलाख निघाला की त्यानं पोलीस चौकशीत आपल्यावर काडीचाही संशय येणार नाही अशा हुशारीनं सर्व प्रश्नांची उत्तरं दिली होती. रोनिलच्या कुटुंबीयांनी आता विकास यादव याला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे.