कुरार पोलिसांची छप्परतोड कारवाई, एटीएममध्ये बोलबच्चन करत लुबाडणाऱ्या टोळीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 12:14 PM2023-06-22T12:14:50+5:302023-06-22T12:15:05+5:30
मशीनमधून गुपचूप रक्कम काढताना साथीदार पीडिताला व्यवहार पूर्ण झाल्याचा विश्वास दाखवत त्यांची फसवणूक करायचे.
मुंबई : नागरिकांना पैसे जमा करणे किंवा काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम केंद्रांवर जाऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या चौघांना कुरार पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी छप्पर तोडून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा गाशा गुंडाळण्यात आला. त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात असंख्य लोकांची फसवणूक केल्याची माहिती असून अद्याप मुंबईत घडलेल्या नऊ प्रकरणांची उकल केल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पोलिसांनी धर्मवीर किशून महतो (३२), विवेककुमार पासवान (२८), बीरलाल साह (२३) आणि किशोर महतो (२८) अशी त्यांची नावे असून टोळीचा आणखी एक सदस्य अरुण प्रसाद (२८) हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी मूळचे बिहारचे असून, त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते पकडले न जाता देशभरात फसवणुकीच्या कारवायांमध्ये गुंतले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लोकांना पैसे जमा करणे किंवा काढण्यात मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम केंद्रांवर जायचे. त्या टोळीचा एक सदस्य केंद्रात राहून पीडितांना मदत करण्याचा बहाणा करतो तर दुसरा घाईत असल्याचे भासवत असतो. मशीनमधून गुपचूप रक्कम काढताना साथीदार पीडिताला व्यवहार पूर्ण झाल्याचा विश्वास दाखवत त्यांची फसवणूक करायचे.
तर दुसऱ्या पद्धतीत नोटांचे बंडल घेऊन ग्राहक म्हणून उभे राहायचे. त्या बंडलमध्ये फक्त पुढच्या आणि मागच्या नोटा खऱ्या तर बाकीचे कोरे कागद होते. पैसे जमा करणाऱ्या पीडितांना नकळत ते बंडल दिले जायचे आणि त्या बदल्यात खऱ्या नोटा घेऊन पसार व्हायचे. लिला जेवियर (५७) या महिलेला मे महिन्यात या टोळक्याने अशाच प्रकारे ५० हजार रुपयांना लुबाडले होते. पोलिस उपायुक्त स्मिता पाटील आणि वरिष्ठ निरीक्षक सतेश गाढवे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक पंकज वानखेडे आणि पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डेटा रेकॉर्डचा वापर करत आरोपींचे भांडुपमधील ठिकाण शोधले आणि टोळीतील इतर सदस्यांची माहिती देणाऱ्या धर्मवीर महतोला अटक केली.
गुन्ह्यांची होणार उकल
अटक कारवाईदरम्यान आरोपींनी छत फोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत तिघांना पकडले, तर एक जण पळून गेला. अटक केलेल्या व्यक्तींनी त्यांच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून मुंबईसह, केरळ आणि दक्षिण भारतातील गुन्हे उघड झाले आहेत.