रोशनी शिंदे मारहाण: अदखलपात्र गुन्हा, न्यायालयाच्या परवानगीने तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 09:21 AM2023-04-06T09:21:18+5:302023-04-06T09:21:35+5:30
रोशनी यांना सोमवारी मारहाण केल्याप्रकरणी त्यांनी रात्री १० वाजता गुन्हा नोंदविण्यासाठी कासारवडवली पोलिसांत तक्रार केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : शिवसेना युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला आणि मारहाणप्रकरणी अखेर कासारवडवली पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात बुधवारी दुपारी अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल झाला आहे. न्यायालयाच्या परवानगीने पोलिस याप्रकरणी तपास करणार असल्याची ग्वाही पोलिस आयुक्त जयजित सिंग यांनी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रोशनी यांना सोमवारी मारहाण केल्याप्रकरणी त्यांनी रात्री १० वाजता गुन्हा नोंदविण्यासाठी कासारवडवली पोलिसांत तक्रार केली. दुसरा दिवस उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मोर्चाची हाक दिली. मोर्च्यापूर्वीच अनाेळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शिंदे यांना डिस्चार्ज
सीसीटीव्ही फुटेज, तसेच इतर माहितीच्या आधारे जबाब नोंदवून पोलिस तपास करीत असल्याचे पोलिस आयुक्तांनी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मोर्चा सुरू होण्यापूर्वीच रोशनी शिंदे यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयातून बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने ‘लाेकमत’ला सांगितले.