कुजलेले मृतदेह सापडले, अख्खं कुटुंब संपवलेल्या आरोपीला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 05:41 PM2022-03-31T17:41:48+5:302022-03-31T17:49:50+5:30
Murder Case : पोलिसांनी एका घरातून चार कुजलेले मृतदेह ताब्यात घेतल्या नंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येनंतर खळबळ माजली होती. पोलिसांनी या गुह्याची अवघ्या ४८ तासांत उकल केल्याचा दावा केला आहे. या हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी विनोद मराठी उर्फ विनोद गायकवाड याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. अहमदाबादच्या ओढव परिसरात एक महिला, तिची 15 आणि 17 वर्षांची दोन मुले आणि आजीची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी एका घरातून चार कुजलेले मृतदेह ताब्यात घेतल्या नंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
विनोद गायकवाड हा ओढव परिसरात टेम्पो चालक म्हणून काम करतो. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने विनोद आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडणं होत होती. विनोदला दारूचे व्यसन आहे आणि त्याला पत्नीच्या चारित्र्यावर देखील संशय होता. कुटुंबात होत असलेल्या सततच्या भांडणामुळे त्याने घरातील सर्व सदस्यांची हत्या एकत्र केली आणि मृतदेह घरातच टाकून पळ काढला. या घटनेनंतर आरोपी सुरतला पळून गेला. त्यानंतर तो सुरतहून इंदूरला गेला. आरोपी इंदूर सोडण्याच्या प्रयत्नात असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडले. घटनेच्या ४८ तासांच्या आतच अहमदाबाद क्राइम ब्रँचने हत्येप्रकरणी विनोद याला अटक केली.
आरोपी आता या चारही खुनांबद्दल आपला जबाब सातत्याने बदलत आहे. हत्येच्या एकाही प्रत्यक्षदर्शीला जिवंत सोडायचं नसल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची हत्या केल्याचे आरोपीने गुन्हे शाखेला सांगितले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोदने पत्नी, दोन मुले आणि आजी यांची हत्या केली. विनोदने त्याच्या आजीवर यापूर्वी देखील हल्ला केला होता. मात्र, मुलीचा विचार करून सासूने या हल्ल्याची माहिती कोणालाही दिली नाही.