अबब... ४५०० कोटींचा रॉयल ट्विंकल स्टार क्लबने १५ हजारांहून जास्त गुंतवणूकदारांना लावला चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 03:34 PM2018-09-11T15:34:52+5:302018-09-11T15:45:26+5:30
या तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून आरोपींनी लोकांना पैशांची वेगवेगळी अमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले होते.
मुंबई - नानाविध हॉलिडेज पॅकेजमध्ये गुंतवणूक करा आणि भरघोस व्याजासह परतावा मिळवा असे आमिष दाखवून वडाळा येथील रॉयल ट्विंकल स्टार क्लबने 15 हजारांहून अधिक गुंतवणूकदारांना 4,500 कोटींचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तब्बल 15 हजार गुंतवणूकदारांनी तक्रारी दिल्या असून त्याआधारे आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) रॉयल ट्विंकलच्या दोघा संचालकांना जेरबंद केले आहे. लोकांना फसविणाऱ्या भामटय़ांनी ट्विंकल एन्वयारेटेक प्रा.लि., रॉयल ट्विंकल स्टार क्लब, ट्रिट्स प्रा.लि. अशा तीन कंपन्या सुरू केल्या होत्या. या तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून आरोपींनी लोकांना पैशांची वेगवेगळी अमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले होते.
प्रकाश उत्तेकर (वय 58) आणि व्यंकटरामन नटराजन (वय 60) अशी अटक दोन संचालकांची नावे आहेत. या दोघांनाही कोर्टात हजर केले असता त्यांना 14 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. क्लबचे दैनंदिन काम हे दोघे सांभाळायचे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा कट रचण्यात या दोघांचा हात असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यात पोलिसांनी याआधी ओमप्रकाश गोएंका याला अटक केली होती. गोएंका सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आतापर्यंत 15 हजार गुंतवणूकदार पुढे आले असले तरी तक्रार देणाऱ्यांचा आकडा लाखाच्या घरात आहे, तसेच यात आणखी भामटय़ांना अटक होण्याची शक्यता आहे, असे ईओडब्ल्यूच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात पहिली तक्रार वडाळा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.