विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 07:02 PM2024-09-23T19:02:48+5:302024-09-23T19:04:23+5:30
मध्य प्रदेशात विशेष लष्करी ट्रेन जात असताना डिटोनेटरचा स्फोट झाला होता. या प्रकरणात आता एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून, तो रेल्वे कर्मचारी असल्याचे समोर आले आहे.
१८ सप्टेंबर रोजी भुसावळ रेल्वे विभागातील नेपानगर आणि खंडवा रेल्वे स्थानकादरम्यान सागफाटा रेल्वे रुळावर डिटोनेटर्स फुटले होते. विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली ही स्फोटके ठेवण्यात आली होती. स्फोट झाल्यामुळे अधिकाऱ्यांची विशेष लष्करी ट्रेन काही वेळासाठी थांबवण्यात आली होती. या प्रकरणात आता एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तीनेच डिटोनेटर्स चोरल्याचा आरोप आहे.
रेल्वे संरक्षण दलाने (RPF) एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याचे नाव साबीर आहे. त्याने १० डिटोनेटर चोरल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात आरपीएफने लोहमार्गावर गस्त घालणाऱ्या एक कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेतले आहे.
On detonators found on a railway track in Burhanpur, Madhya Pradesh, Central Railway says, "Shabeer, a Railway employee has been detained by Railway Protection Force (RPF) for enquiry."
— ANI (@ANI) September 23, 2024
पोलीस अधिकाऱ्याने काय सांगितले?
खंडवा आरपीएफ निरीक्षक संजीव कुमार यांनी सांगितले की, "आम्ही रेल्वे संपत्ती (बेकायदेशीरपणे कब्जा) अधिनियमातील नियम ३ (अ) नुसार डिटोनेटरची चोरी केल्याच्या आरोपाखाली साबीर नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे."
"साबीर गँगमनच्या वरच्या पदावर कार्यरत आहे. तो रेल्वे रुळावर गस्त घालण्याचे काम करतो. दोन-तीन सरकारी विभागांकडे डिटोनेटर आहेत. आरोपींना अधिकृतपणे ते देण्यात आलेले नव्हते", असे कुमार यांनी सांगितले.
"घटना घडली त्यादिवशी साबीर ड्युटीवर नव्हता, पण नशेत होता. आरपीएफ आणखी एका कर्मचाऱ्याला चौकशी करू सोडून दिले", असेही कुमार यांनी सांगितले.