हवालाच्या माध्यमातून हाँगकाँगला पाठविण्यात आले ११०० काेटी रुपये, ईडीकडून सीएला अटक, बँकांमार्फत झाले व्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 09:33 AM2021-12-04T09:33:44+5:302021-12-04T09:34:01+5:30
Crime News: हवालाच्या माध्यमातून हाँगकाँगला ११०० काेटी रुपये पाठविल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील रवी कुमार नावाच्या एका सीएला अटक केली आहे.
नवी दिल्ली : हवालाच्या माध्यमातून हाँगकाँगला ११०० काेटी रुपये पाठविल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील रवी कुमार नावाच्या एका सीएला अटक केली आहे. मुंबईतून एसबीआय व इतर बँकांच्या माध्यमातून बनावट बिल आणि क्लाउड सीसीटीव्ही स्टाेरेजचे बाेगस दर दाखवुन हा गैरव्यवहार केल्याचा आराेप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
ईडीकडून लिंक्यून टेक्नाॅलाॅजिस, डाेकीपे टेक्नाॅलाॅजी यासारख्या अनेक चिनी कंपन्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगप्रकरणी तपास करण्यात येत आहे. या कंपन्यांनी अनेक युझर्सची बेकायदेशीर गेमिंग, ऑनलाइन सट्टा, डेटिंग तसेच स्ट्रिमिंग ॲपच्या माध्यमातून काेट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. हा पैसा ऑनलाइन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा करण्यात आला. त्यानंतर हवालाच्या माध्यमातून क्रिप्टाेकरन्सीची खरेदी, केसांचे व्यापारी तसेच बेकायदेशीर मार्गाने सिंगापूरला पैसे पाठवून मनी लाँड्रिंग करण्यात आले.
याप्रकरणी हैदराबादमध्ये गुन्हे दाखल झाले हाेते. त्यासंबंधी चाैकशीदरम्यान ईडीला एका नव्या पद्धतीचा खुलासा झाला. बनावट एअरवे बिले दाखवून विविध बँकांच्या माध्यमातून बाेगस परकीय पेमेंट दाखविण्यात आले. यासाठी सीसीटीव्हीचे क्लाउड स्टाेरेजसाठी बनावट पावत्याही दाखविण्यात आल्या हाेत्या. रवी कुमारने अशा ६२१ बाेगस प्रमाणपत्रे आणि शेल कंपन्यांच्या लेंस शीटवर स्वाक्षऱ्या केल्या हाेत्या. त्यातील माहितीची पडताळणी त्याने केली नव्हती. त्यामुळे शेकडाे काेटी रुपये हाॅंगकाॅंग येथे पाठवण्यात आराेपींना मदत केली, असा आराेप ईडीने ठेवला आहे.
हरयाणातील हिसार येथील प्रकाश इंडस्ट्रीजची सुमारे २२८ काेटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. हरयाणासह दिल्ली, नाेयडा आणि छत्तीसगड येथील मालमत्तांचा त्यात समावेश आहे. काेल ब्लाॅक वाटपात मनी लाॅंडरींग केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीआयने २०१६ मध्ये गुन्हे दाखल केले हाेते.