लेबर इन्फोर्समेंट अधिकारी निघाला करोडपती! छाप्यात सापडली नोटांनी भरलेली बॅग, 2.25 कोटी रुपयांची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 06:09 PM2021-12-11T18:09:25+5:302021-12-11T18:11:05+5:30
Crime News : लेबर इन्फोर्समेंट अधिकाऱ्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
पाटणा : बिहारमध्ये भ्रष्टाचारात गुंतलेल्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे. याच अनुषंगाने विशेष दक्षता विभागाने शनिवारी पाटण्यात मोठा छापा टाकून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केली. लेबर इन्फोर्समेंट अधिकाऱ्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
बिहारची राजधानी पाटणामधील आलमगंज भागात लेबर इन्फोर्समेंट अधिकाऱ्याच्या घरावर विशेष दक्षता विभागाने छापा टाकला आहे. आतापर्यंत 2.25 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय, कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने, जमिनीची कागदपत्रे, अनेक बँकांचे पासबुक, क्रेडिट कार्ड, मुदत ठेवी आदीही सापडले आहेत.
विशेष दक्षता पथकाने सर्व कागदपत्रे जप्त केली असून जप्त केलेल्या वस्तूंची यादी तयार केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हाजीपूरचे लेबर इन्फोर्समेंट अधिकारी दीपक शर्मा यांचे घर आलमगंज पोलिस स्टेशन हद्दीतील बजरंगपुरी येथील श्रीराम पथ येथे आहे. शनिवारी सकाळी विशेष दक्षता पथक दीपक शर्मा यांच्या घरी पोहोचले आणि छापे टाकण्यास सुरुवात केली. अजून कारवाई सुरू आहे.
दरम्यान, 9 डिसेंबर रोजीही विशेष दक्षता पथकाने बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी मोतिहारीचे उत्पादन शुल्क अधीक्षक अविनाश प्रकाश यांच्या घरावर छापा टाकला होता. अविनाशच्या घरातून 23 जमिनीची कागदपत्रे, बँक खाती, एलआयसी कागदपत्रांसह कोट्यवधी रुपयांची मालमत्ता उघडकीस आली होती.