४५ खातेदारांना ६ कोटींचा गंडा; मलायका मल्टिस्टेट पतसंस्थेतील ग्राहकांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 07:09 PM2020-10-11T19:09:26+5:302020-10-11T19:19:01+5:30
Crime News : आता पर्यंत ४५ खातेधारकांना ६ कोटी रुपयांना फसवल्याचे समोर आले असून हा आकडा आणखी वाढणार आहे .
मीरारोड - मीरारोडच्या मलायका मल्टिस्टेट को.ऑ. क्रेडिट सोसायटीने ठेवीदारांना आकर्षक व्याजचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी संचालकांवर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपीना अजून अटक झालेली नाही . आता पर्यंत ४५ खातेधारकांना ६ कोटी रुपयांना फसवल्याचे समोर आले असून हा आकडा आणखी वाढणार आहे . कारण सदर संस्थेचे सुमारे ७०० ते ८०० खातेधारक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले .
मीरारोडच्या शांतीपार्क भागातील हॅपी होम बिल्डिंग नं. ०२ मध्ये मलायका मल्टिस्टेट को.ऑ.सोसायटी लिमिटेड आहे . संस्थेचे अध्यक्ष गिल्बर्ट बॅप्टिस्ट व संचालक मंडळ यांनी त्यांच्या पतसंस्थेत गुंतवणूक केल्यास आकर्षक व्याज देण्याच्या जाहिराती करून लोकांना आमिष दाखवले . पतसंस्थेच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करून गुंतवणुकीसाठी लोकांना भुलवत असत .
त्यामुळे ठेवीदार व खातेधारकांनी मुदतठेव, आरडी, बचत खाते, शेअर व इतर वेगवेगळ्या स्वरूपात रक्कमा गुंतवला आहेत . ह्या मध्ये गुंतवणूक करणाऱ्यात निवृत्त आणि वृद्धांची संख्या देखील लक्षणीय आहे . पतसंस्थेने ठेवीदारांना व्याज देण्यास टाळाटाळ चालवली . मुदतठेव , शेअर आदी गुंतवणुकीवर देखील पैसे दिले नाहीत .
ठेवीदार हे सतत पतसंस्थेच्या कार्यालयात जाऊन पैसे मागत असत पण त्यांची बोळवण केली जात होती . त्यातच कोरोना संसर्ग काळात लोकांची आर्थिक स्थिती बिकट बनली . अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ठेवीदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली .
फिर्यादी लॉविना डिमेलो (४९) यांच्या त्यावरून फिर्यादी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . लॉविना यांनी पतसंस्थेत मुदत ठेव, शेअर, बचत खाते अश्या स्वरूपात एकूण ३९ लाख ३९ हजार रुपये गुंतविले होते. एप्रिल २०२० पासून त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम मागून देखील पतसंस्थेने परत केली नाही . त्यांच्या सह अन्य ४५ गुंतवणूकदारांची गुंतवलेली रक्कम देखील मिळालेली नाही . ह्या एकूण ठेवीदारांची फसवणूक झालेली रक्कम ६ कोटींच्या घरात आहे .
या प्रकरणी पतसंस्थेचा अध्यक्ष गिल्बर्ट बॅप्टिस्ट व संचालक मंडळ वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . बॅप्टिस्ट हा पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत . ह्या प्रकरणी अजून कोणाला अटक झालेली नाही . तर फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी आहे . त्यामुळे दाखल गुन्ह्यात फसलेल्या गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे .