बांधकाम व्यावसायिक सुशिल अगरवालकडून नातलगांची ६ कोटींची फसवणूक; विक्री केलेल्या फ्लॅटवर घेतलं होतं कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 12:58 AM2021-10-24T00:58:40+5:302021-10-24T01:01:58+5:30
याप्रकरणी बलबीर रामलाल अगरवाल (वय ४८, रा. परशुराम कुटी, प्रभात रस्ता) यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुशिल घनश्याम अगरवाल (रा.वेलस्ली कोर्ट, कॅम्प) व इतर भागीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे- बांधकाम व्यावसायिक सुशिल अगरवाल यांनी आपले नातलग असलेल्यांनाच पाच वर्षात रक्कम दुप्पट करण्याचे आश्वासन दिले. ६ कोटी ४० हजार रुपयांच्या गुंतवणुकीच्या बदल्यात ३२ सदनिका दिल्या. मात्र, त्यातील १४ सदनिका अगोदरच गहाण ठेवून त्यावर कर्ज काढून फसवणूक केली आहे.
याप्रकरणी बलबीर रामलाल अगरवाल (वय ४८, रा. परशुराम कुटी, प्रभात रस्ता) यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुशिल घनश्याम अगरवाल (रा.वेलस्ली कोर्ट, कॅम्प) व इतर भागीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बलबीर अगरवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व इतर प्रकल्पात गुंतवणुक करतात. सुशिल अगरवाल हे त्यांचे नातेलग आहेत. सुशिल अगरवाल, अल्नेश सोमजी व इतर भागीदारांनी २०१७ मध्ये फिर्यादी यांना त्यांच्या प्रकल्पात गुंतवणुक केल्यास ५ वर्षात रक्कम दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांनी ६ कोटी ९० लाख ९२ हजार ५०० रुपयांची गगन एस डेव्हलपर्समध्ये गुंतवणुक केली. सप्टेंबर २०१९ पर्यंत त्यांना २१ टक्के दराने परतावा दिला. त्यानंतर त्यांनी परतावा देणे थांबविले. त्याबाबत फिर्यादी यांनी चौकशी केल्यावर त्यांनी मुद्दलाची व त्यावरील परताव्याची रक्कम परत करण्यास नकार दिला.
ऑक्टोबर २०१९ मध्ये सुशिल अगरवाल यांनी पैसे परत करणे शक्य नाही. त्याच्या मोबदल्यात पिसोळी येथील गगन केसकेड या प्रकल्पामधील सदनिका देण्याचे आश्वासन दिले. ७ जानेवारी २०२० मध्ये तसा सामंजस्य करार करण्यास सुशिल व अल्नेश रोमजी यांनी भाग पाडले. या करारानुसार त्यांना ३२ सदनिका वाटप केल्याचे दाखविले. हा प्रकल्प ३० डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण होईल, असे सांगितले. प्रत्यक्षात त्यातील १४ सदनिकांवर करार होण्यापूर्वीच नगन अर्बन बँकेकडे गहाण ठेवून कर्ज काढले होते. गगन बिल्डस्केप्स यांचे भागीदारांनी आजतागायत हा प्रकल्प पूर्ण केला नसून त्यामुळे त्यांच्या वाट्याच्या सदनिकला विक्री करु शकले नाहीत.