अवघ्या ७ किलोमीटर अंतरासाठी तब्बल ८ हजार रुपये भाडे वसूल, संजीवनी अॅम्बुलन्सवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 03:23 PM2020-07-09T15:23:26+5:302020-07-09T15:25:23+5:30
कोरोनाबाधित रुग्णाला नेण्यासाठी ८ हजार रुपये वसूल केल्यानंतर अॅम्बुलन्सने आणखी १ हजार १०० रुपयांची मागणी केली
पुणे : बिबवेवाडी ते कर्वेनगर कोविड सेंटर या ७ किमी अंतरासाठी तब्बल ८ हजार रुपये भाडे घेणाऱ्या हडपसरमधील संजीवनी अॅम्बुलन्सवर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक धनंजय गोसावी यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बिबवेवाडी येथील सह्याद्री हॉस्पिटलवरुन दीनानाथ हॉस्पिटल या ७ किमी अंतरासाठी कोरोना बाधित रुग्णाला नेण्यासाठी संजीवनी अॅम्बुलन्सने ८ हजार रुपये वसुल केले. याशिवाय त्यांच्याकडे आणखी १ हजार १०० रुपयांची मागणी केली होती. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने त्यांना ८ हजार रुपये द्यावे लागले होते़ २५ जून रोजी हा प्रकार घडला होता. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर याबाबत संजीवनी अॅम्बुलन्सचे बिल टाकून त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाची माहिती दिली होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दिली होती.त्याची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दखल घेऊन अॅम्बुलन्सवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने फिर्याद देण्यात आली आहे़ आरटीओने ही अॅम्बुलन्स जप्त केली आहे़.
मयुर पुस्तके (रा़ हडपसर) यांच्या मालकीच्या टेम्पो ट्रॅव्हलर हे वाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोबाईल क्लिनिक व्हॅन या सवर्गात नोंदणी करण्यात आलेली आहे़ असे असताना संजीवनी अॅम्बुलन्स सर्व्हिसेस यांनी अॅम्बुलन्स असे प्रदर्शित करुन रुग्णांकडून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने विहित केलेल्या भाडे दरापेक्षा जादा भाडे आकारुन रुग्णांची व शासनाची फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लिटे अधिक तपास करीत आहेत.
याबाबत पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी सांगितले की, आरटीओने अॅम्बुलन्सने किती दर आकारणी करावी, याचे दर दिले आहेत. त्याचे पालन अॅम्बुलन्स सर्व्हिस देणाऱ्यांनी केले पाहिजे. कोरोना संंसर्ग झाल्याचा गैर फायदा त्यांनी घेऊन नये, तसे आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.