ऑनलाईन मागितले ५ रुपये अन् काढून घेतले दिड लाख; भाजपा महिला कार्यकर्त्यास घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 09:31 PM2021-12-26T21:31:59+5:302021-12-26T21:32:34+5:30
Online Fraud : मीरारोडच्या मेरीगोल्ड भागातील संस्कृती इमारतीत राहणाऱ्या भाजपा कार्यकर्त्या स्वाती बन्साली यांना त्यांचे पती राजकुमार यांनी २३ डिसेंबर रोजी दुपारी कॉल केला.
मीरारोड - पतीच्या कुरियरने आलेल्या क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन ५ रुपये भरण्यास गेलेल्या भाजपा कार्यकर्त्या असलेल्या महिलेने स्वतःच्या खात्यातील दिड लाख रुपये गमावल्याचा प्रकार मीरारोड मध्ये घडला आहे.
मीरारोडच्या मेरीगोल्ड भागातील संस्कृती इमारतीत राहणाऱ्या भाजपा कार्यकर्त्या स्वाती बन्साली यांना त्यांचे पती राजकुमार यांनी २३ डिसेंबर रोजी दुपारी कॉल केला. त्यांचे पती वापी येथे भंगार एजंट म्हणून काम करत असून त्यांनी स्वाती यांना सांगितले कि , ब्लु डार्ट कुरीयर मधुन माझे एक्सीस बकेचे क्रेडीट कार्ड आले असुन त्याकरीता मला ऑनलाईन ५ रुपये पाठवायचे आहेत. पतीस मोबाईलचे व ऑनलाईन बँकींगचे ज्ञान नसल्याने स्वाती यांनी त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रातील खात्याद्वारे गुगल पे ने कुरियर करणाऱ्या समोरील इसमाच्या मोबाईल क्रमांकावर ऑनलाईन ५ रुपये पाठवले . त्यावर कुरियर करणाऱ्या इसमाने स्वाती यांना कॉल करून, तुम्हाला आलेला मॅसेज कॉपी करून दुसऱ्या नंबर वर पाठवा असे सांगितले . त्या प्रमाणे स्वाती यांनी आलेला मॅसेज दुसऱ्या नंबर वर पाठवला . परंतु कुरियर करणाऱ्या त्या इसमाने पुन्हा स्वाती याना कॉल केला आणि आणखी एक मोबाईल नंबर देत त्याच्यावर तो मॅसेज चार वेळा फॉरवर्ड करा असे सांगितले . स्वाती यांनी त्याच्या सांगण्या नुसार तो मॅसेज ४ वेळा फॉरवर्ड केला . तेव्हा त्या इसमाने ५ रुपये मला मिळाले असे स्वाती यांना कळवले . स्वाती यांना देखील ५ रुपये त्यांच्या खात्यातून गेल्याचा संदेश आला .
मात्र दुसऱ्या दिवशी २४ डिसेंबर रोजी दुपारी स्वाती यांना त्यांच्या मोबाईल वर संदेश आला कि , त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्या मधून तब्बल ५ वेळा २० हजार रुपये प्रमाणे एकूण १ लाख रुपये गेले आहेत . ते पाहून धक्का बसलेला असतानाच त्यांना त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून २ वेळा २० हजार आणि एकदा १० हजार असे एकूण ५० हजार रुपये दुसऱ्या खात्यावर गेल्याचे पाठोपाठ संदेश आले . त्यांनी लगेच दोन्ही बँकेत जाऊन त्यांची खाती बंद करण्यास सांगितली . त्या नंतर त्यांनी पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेत जाऊन तक्रार केली.
सायबर गुन्हे शाखेने माहिती घेतली असता स्वाती यांच्या खात्यातून परस्पर वळती केलेली रक्कम हि रणजित कुमार याच्या खात्यात गेली असून त्याचे खाते गोठवण्यात आले . या प्रकरणी २४ डिसेंबर रोजी स्वाती यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस याचा तपास करत आहेत . विशेष म्हणजे ५ रुपये स्वाती यांनी त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून दिले असताना संदेश फॉरवर्ड केल्या वरून सायबर ठिकाने बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून ५० हजार लांबवलेच पण त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातील त्यांचे १ लाख रुपये लांबवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.