RTI कार्यकर्ते आणि पत्रकाराची निर्घृण हत्या, रस्त्यावर आढळला जळालेला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 03:08 PM2021-11-14T15:08:06+5:302021-11-14T15:08:12+5:30
पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.
मधुबनी:बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी परिसरात पुन्हा एका हत्येच्या घटनेने खळबळ माजली आहे. येथे रस्त्याच्या कडेला एका 25 वर्षीय तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह पोत्यात बांधलेला आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. बुधीनाथ झा उर्फ अविनाश असे मृताचे नाव असून तो बेनीपट्टी बाजार येथील रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बुद्धीनाथ झा हे आरटीआय कार्यकर्ते म्हणून काम करायचे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पत्रकारिताही करायचे. नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 नोव्हेंबरच्या रात्रीपासून बुद्धिनाथ झा बेपत्ता होते. तीन दिवस शोध घेतल्यानंतर अखेर 11 नोव्हेंबर रोजी कटुंबियांनी बेनीपट्टी पोलिस ठाण्यात बुद्धिनाथ झा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर बेनिपट्टी पोलिस बेपत्ता तरुणाचा शोध घेत होते. दरम्यान, बेनीपट्टी पोलिस ठाण्याच्या उदेन गावात राज्य महामार्ग क्रमांक 52 जवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपातून एका 25 वर्षीय तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. तपासानंतर मृतदेह बुद्धिनाथ झा उर्फ अविनाश यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
बुद्धिनाथ झा आरटीआय कार्यकर्ते होते
मृतदेह सापडल्यानंतर बेनिपट्टी पोलिसांनी नव्याने गुन्हा दाखल करुन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी बुद्धिनाथ झा यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आली आहे. बेनीपट्टी पोलिस स्टेशनचे प्रभारी अरविंद कुमार म्हणतात की, पोलिस पथक या प्रकरणात अनेक पैलूंचा तपास करत आहे. लवकरच प्रकरण उघडकीस येईल, अशी आशा आहे.
मृतांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, बुद्धिनाथ झा हे आरटीआय कार्यकर्ते म्हणून काम करायचे आणि त्यांनी बेनिपट्टीतील काही बेकायदेशीरपणे चालवल्या जाणार्या खाजगी नर्सिंग होमच्या विरोधात काही महत्त्वाची माहिती गोळा केली होती. याप्रकरणी प्रशासनाकडे कारवाईची मागणीही केली होती. पण, त्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यात आली आहे.