प्रेम, प्रेयसी अन् रहस्य! जिवंतपणीच स्वत:ला मृत दाखवण्याची कारनामा; पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 10:53 AM2023-10-27T10:53:44+5:302023-10-27T10:56:39+5:30

हा प्रकार उघड होताच पोलिसांनी चंद्रमोहन आणि त्याच्या गर्लफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना जेलमध्ये पाठवले.

RTI activist Chandra Mohan Sharma, who in trying to fake his own death had killed a homeless man | प्रेम, प्रेयसी अन् रहस्य! जिवंतपणीच स्वत:ला मृत दाखवण्याची कारनामा; पोलीस हैराण

प्रेम, प्रेयसी अन् रहस्य! जिवंतपणीच स्वत:ला मृत दाखवण्याची कारनामा; पोलीस हैराण

नवी दिल्ली – तो एक आरटीआय कार्यकर्ता होता, माहितीच्या अधिकाराचा त्याने खूप वापर केला. परंतु एकदिवशी अचानक त्याचा मृतदेह कारमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळला. या आरटीआय कार्यकर्त्याचे तोंड कायमचे बंद केले होते. परंतु या घटनेच्या ४ महिन्यांनी या संशयास्पद मृत्यूवरील पडदा बाजूला झाला. त्यानंतर झालेल्या खळबळजनक खुलाशाने पोलीसही हैराण झाले.

प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे असतात. एक पतीचा, एक प्रियकराचा, एक गुन्हेगाराचा...या सर्व चेहऱ्यामागील खरा खेळ सुरु झाला होता तो मे २०१४ मध्ये. एक असा खेळ ज्याने सगळ्यांना हादरवून टाकलं. नोएडातील एल्डिको गोल सर्कलजवळ एका होंडा सिटी कारला आग लागली अशी बातमी पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत कार पूर्णत: जळाली होती आणि कारमधील एक व्यक्तीही जळाला होता. तपासात आढळलं की ही कार आरटीआय कार्यकर्ता चंद्रमोहन शर्माची होती. चंद्रमोहन संपूर्ण परिसरात एक खरा माणूस सत्याचा शोध घेणारा व्यक्ती म्हणून होती. अनेकदा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या.

चंद्रमोहनबाबत कळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. काही दिवसांपूर्वी चंद्रमोहनने पोलीस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर संशयास्पद अवस्थेत चंद्रमोहनचा मृतदेह सापडल्याने अनेक प्रश्न उभे राहिले. चंद्रमोहनचे शत्रू कोण असावेत यादिशेने पोलीस तपास सुरू होता. परंतु काही गोष्टी पोलिसांना गोंधळात टाकत होत्या. चंद्रमोहनच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूला ४ महिने झाले. तपास सुरु होता. पण चार महिन्यांनी तपासाला रंग आला. नोएडापासून शेकडो मील दूर नेपाळमध्ये अखेर तो सापडतो. तो व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून चंद्रमोहन होता, हो चंद्रमोहन, जो जिवंत सापडला.

कारमध्ये जळालेल्या अवस्थेत कोण होतं?

एक मृत व्यक्ती जिवंत समोर आला तर अचानक डोक्यात अनेक प्रश्न निर्माण होतात. अखेर एक जिवंत व्यक्तीचा बनावट मृत्यू का दाखवला? त्याच्या मृत्यूने कोणाला फायदा होणार होता? सर्वात महत्त्वाचे म्हणजे चंद्रमोहन जिवंत होता मग त्याच्या कारमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह कोणाचा होता? ज्यादिवशी कारमध्ये कथितरित्या चंद्रमोहनचा मृत्यू जळाल्यामुळे झाल्याचे समजले तिथून याची सुरुवात होते. चंद्रमोहन शर्मा नोएडाच्या अल्फा सेक्टरमध्ये पत्नी सविता शर्मासोबत राहत होती. या घटनेनंतर सविताने हा मृतदेह तिच्या पतीचा असून ही दुर्घटना नाही तर हत्या आहे असा थेट आरोप केला होता.

पोलिसांना एक गोष्ट कळत नव्हती की ज्यादिवशी चंद्रमोहनचा कथित मृतदेह सापडला त्याचदिवशी त्यांच्या परिसरातून एक मुलगी बेपत्ता झाली होती. त्या बेपत्ता मुलीचा मोबाईल जेव्हा पोलिसांनी तपासला तेव्हा असा खुलासा झाला ज्याने पोलिसांना सर्व प्रश्नांची उत्तरे सापडली. मुलीचा नंबर चंद्रमोहनच्या नावावर रजिस्टर्ड होता. ती मुलगी चंद्रमोहनची प्रेयसी होती. ज्यादिवशी कारमध्ये आग लागली तेव्हा चंद्रमोहनच्या प्रेयसीसोबतच त्याच परिसरातील एक भिकारीही बेपत्ता होता. आता एक एक साखळी पोलीस जोडत होते.

पोलिसांना मिळाला पुरावा

पोलिसांनी जेव्हा मुलीचा मोबाईल नंबर ट्रेस करून लोकेशन शोधले तेव्हा ती मुलगी नेपाळला असल्याचे समजले. ती घरच्यांसोबत संवाद साधायची. पोलिसांनी मोबाईलच्या आधारे नेपाळपर्यंत पोहचली. ज्याठिकाणी पोलिसांना मुलीसोबतच चंद्रमोहन जिवंत सापडला. चंद्रमोहन व्यवसायाने इंजिनिअर होता. एका प्रसिद्ध कार कंपनीत तो कामाला होता. चंद्रमोहनची मैत्री परिसरात राहणाऱ्या एका मुलीशी झाली. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. मुलीच्या प्रेमात चंद्रमोहन कर्जात डुबत गेला. गर्लफ्रेंडच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यानं सातत्याने कर्ज घेतली. चंद्रमोहनने स्वत:चा वीमा उतरवला होता. जर त्याचा मृत्यू झाला तर वीम्याची रक्कम मिळेल आणि कर्जातून मुक्त होऊ असं त्याला वाटले. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचा या प्लॅनिंगमध्ये सामावून घेतले.

चंद्रमोहनने त्याच्या सारख्याच शरीरयष्टी, उंचीला दिसणाऱ्या माणसाचा शोध घेतला. तेव्हा त्याला भिकारी दिसला. चंद्रमोहनने आधी त्याला अज्ञात व्यक्तींकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यानंतर चंद्रमोहनचा पुढचा प्लॅन तयार झाला. त्यानं भिकारीची हत्या केली. त्यानंतर त्याला त्याच्या कारमधील ड्रायव्हिंग सीटवर बसवले. त्यानंतर कारला आग लावली ज्यामुळे जगाच्या नजरेत त्याचा मृत्यू कारमधील अपघातात झाल्याचे दिसून येईल.

घटनेनंतर चंद्रमोहन शर्मा थेट नेपाळला गेला. चंद्रमोहनचे रहस्य इतक्या लवकर उघडलं नसते जर त्याने गर्लफ्रेंडच्या मोबाईलमधील सिमकार्डसाठी त्याचे नाव दिले नसते. चंद्रमोहनच्या बनावट मृत्यूचा पर्दाफाश झाल्यानंतरही पत्नीने नेपाळमध्ये पकडलेला व्यक्ती तिचा पती नसल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी कारमध्ये मिळालेल्या मृतदेहाचे पोस्टमोर्टम केले होते. त्याचे दात काढून ठेवले होते जेणेकरून डिएनएतून मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटेल. अनेक दिवसांपर्यंत हे प्रकरण चांगलेच गाजले. हा प्रकार उघड होताच पोलिसांनी चंद्रमोहन आणि त्याच्या गर्लफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना जेलमध्ये पाठवले.

Web Title: RTI activist Chandra Mohan Sharma, who in trying to fake his own death had killed a homeless man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.