...अन् महिला पोलीस ठाण्यातच निरीक्षकाच्या अंगावर धावली; कपडे फाडू लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 12:28 PM2019-08-13T12:28:35+5:302019-08-13T12:28:47+5:30
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर
पोलीस ठाण्यात फ्री स्टाईल; निरीक्षकाची कॉलर पकडून थेट गणवेश फाडण्याचा प्रयत्न
बागपत: तरुणाला चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना एका धक्कादायक घटनेचा सामना करावा लागला. तरुणाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात येऊन गोंधळ घातला. यावेळी एक महिला थेट निरीक्षकावर धावून घेतली. या प्रकरणाचं व्हिडीओ चित्रीकरण करत असलेल्या निरीक्षकासमोर तिनं कपडे फाडण्याचादेखील प्रयत्न केला.
उत्तर प्रदेशच्या बागपतमधील दोघट भागातून पोलिसांनी चोरी प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतलं. यानंतर तरुणाचे नातेवाईक पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी एका महिलेनं थेट पोलीस निरीक्षकाची कॉलर धरली. तिनं निरीक्षकाचा गणवेश फाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यातून बाहेर काढलं. पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या तरुणाच्या इतर नातेवाईकांनादेखील पोलिसांनी पळवून लावलं.
तीन दिवसांपूर्वी दोघट-पुसार मार्गावर तीन-चार जणांनी एका व्यक्तीचे १ हजार रुपये चोरुन पोबारा केला. या प्रकरणाचा तपास करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद प्रकाश, सुशील, रामबीर पोलिसांसह दोघटमधील एका तरुणाच्या घरी पोहोचले. त्यांनी तरुणाला ताब्यात घेताच त्याच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरू केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेजारी जमले. तिथून पोलिसांनी कसाबसा मार्ग काढत तरुणाला घेऊन पोलीस ठाणं गाठलं. मात्र तरुणाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
यावेळी एका निरीक्षकानं पोलिसांशी वाद घालणाऱ्या महिलेचं चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. यानंतर महिलेनं स्वत:चे कपडे फाडण्याचा प्रयत्न सुरू केला. या महिलेनं निरीक्षकाच्या कॉलरला हात घालत त्याचा गणवेश फाडण्याचाही प्रयत्न केला. यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बळाचा वापर करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी लाठीमार करत तरुणाच्या नातेवाईकांना पळवून लावलं. मात्र यामुळे बराच काळ पोलीस ठाण्यात तणावाचं वातावरण होतं.