लव्ह जिहादचा आरोप करीत विवाहच उधळून लावला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 07:41 AM2021-07-31T07:41:24+5:302021-07-31T07:42:18+5:30
Love jihad: लग्न करण्यासाठी आलेली वधू या दडपणामुळे आल्यापावली परत गेली.
लखनाै : बळजोरीने धर्मांतर केल्याचा व लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप करीत उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी एक विवाह उधळून लावला. लग्न करण्यासाठी आलेली वधू या कार्यकर्त्यांच्या दडपणामुळे आल्यापावली परत गेली.
करणी सेना ही हिंदुत्ववादी संघटना आहे. बलियाचे पोलीस अधीक्षक विपिन ताडा यांनी सांगितले की, आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार वधूपित्याने पोलिसांत दिली होती. त्यामुळे पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेतले व वडिलांच्या ताब्यात दिले. करणी सेनेचे कार्यकर्ते न्यायालय परिसरात जाऊन या वधूवर प्रश्नांची सरबत्ती करीत असल्याचा एक व्हिडिओ झळकला आहे. आपण दिलशाद सिद्दीकी (२४ वर्षे) या युवकाशी विवाह करणार असल्याचे ही वधू करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना सांगत असल्याचे या व्हिडिओत दिसते. तुझे नाव काय? तू कोणत्या ज्ञातीतील आहेस? ज्याच्याशी लग्न करते आहेस तो मुलगा परधर्मातील आहे का, तू त्याच्याशी लग्न का करीत आहेस, अशाही प्रश्नांची सरबत्ती करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी वधूवर केली.
वधूने मी दलित समाजातील असून, सज्ञान आहे व स्वत:च्या इच्छेने हा विवाह करीत आहे असे उत्तर दिलेले व्हिडिओत पाहायला मिळते. या संघटनेने दिलशादला धमकाविल्याने त्याने विवाह न करताच काढता पाय घेतला. काही कार्यकर्त्यांनी वधूला पोलीस ठाण्यात गाठले. ज्या आई-वडिलांनी तुला मोठे केले, शिक्षण दिले, त्यांच्याशी तू असे का वागत आहेस, असा जाब तिला विचारला.
वडिलांची तक्रार
वधूच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दिलशाद सिद्दीकीविरोधात गुन्हा नोंदविला आहे. आपली मुलगी दोन दिवस घरी आलेली नाही. तिचा विवाह बळजोरीने दिलशादशी लावला जात आहे असा वडिलांचा आरोप होता. बुधवारी करणी सेनेने घातलेल्या गोंधळानंतर संध्याकाळी वडिलांनी तक्रार केली होती.