Sachin Vaze: सचिन वाझेंच्या इशाऱ्यावरून मनसुख हिरेनची हत्या; एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 04:18 AM2021-03-23T04:18:56+5:302021-03-23T05:53:03+5:30

Mansukh Hiren Murder: खुनाचा तपास सध्या एटीएसकडेच, गेले काही दिवस या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे हे ठाण्याच्या कार्यालयात तळ ठोकून आहेत.

Sachin Vaze: Assassination of Mansukh Hiren at the behest of Sachin Vaze; ATS officials confirmed this | Sachin Vaze: सचिन वाझेंच्या इशाऱ्यावरून मनसुख हिरेनची हत्या; एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा

Sachin Vaze: सचिन वाझेंच्या इशाऱ्यावरून मनसुख हिरेनची हत्या; एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा

Next

जितेंद्र कालेकर

ठाणे : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सचिन वाझे हाच असून, त्याच्याच इशाऱ्यावरून हे हत्याकांड घडल्याची माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, या हत्या प्रकरणाचा तपास अद्याप एटीएसकडेच असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

गेले काही दिवस या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे हे ठाण्याच्या कार्यालयात तळ ठोकून आहेत. रविवारी (२१ मार्च) या हत्या प्रकरणात नरेश गोर आणि विनायक शिंदे या दोन आरोपींना अटक करण्यात आली. गोर हा क्रिकेट बुकी आहे. शिंदे निलंबित पोलीस कर्मचारी असून, २००७च्या वर्सोवा येथील लखनभय्या बनावट चकमकीमध्ये त्याला जन्मठेप झालेली आहे. याच गुन्ह्यात तो पेरोल रजेवर असताना वाझेसाठी काम करीत असल्याचे समोर आले आहे. मनसुख हत्या प्रकरणात १० ते ११ आरोपींचा समावेश असून, हत्या नेमकी कोणत्या कारणांमुळे आणि कशी केली, याचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान, विनायक शिंदे याच्या कळवा नाका येथील गोल्ड सुमित या इमारतीच्या तळमजल्यावरील घरी एटीएसच्या एका पथकाने रविवारी आणि सोमवारीही झडती घेतली. त्याचबरोबर त्याच्या घरात चौकशी करून काही कागदपत्रेही ताब्यात घेतल्याचे समजते.

आम्हाला काहीच बोलायचे नाही...
शिंदे याच्या घरी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट दिली असता, आम्हाला या विषयावर काहीच बोलायचे नसल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले. विनायकसह त्याच्या भावाचे कुटुंबीय एकाच घरात वास्तव्याला आहे. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी शिंदेला ताब्यात घेतल्यापासून त्याच्या घराचा परिसरही चर्चेत आला आहे.

गेल्या एक आठवडाभरापासून मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही एनआयएकडे जाणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आहे. मात्र, अद्याप एनआयएकडून खुनाचा तपास करण्याबाबत कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही किंवा त्यांच्याकडून तशी मागणीही झाली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अजूनही एटीएसकडेच असून, लवकरच यामध्ये आणखी काही जणांना अटक केली जाईल, असेही एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Sachin Vaze: Assassination of Mansukh Hiren at the behest of Sachin Vaze; ATS officials confirmed this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.