Sachin Vaze : वाझेनेच स्काॅर्पिओत ठेवल्या जिलेटीनच्या कांड्या, धमकीचे पत्र, एनआयएच्या तपासातून उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 06:31 AM2021-04-02T06:31:27+5:302021-04-02T06:33:58+5:30

Sachin Vaze News : एनआयएच्या तपास पथकाने  यासंबंधी १७ फेब्रुवारीपासून ते ५ मार्चपर्यंतच्या सर्व घटना व त्यांच्या गुन्ह्याची  सर्व संगती जुळवली आहे. गाडीत ठेवलेल्या २० जिलेटीनच्या कांड्या  नागपूरमधील एका कंपनीच्या असून, वाझेने त्या वसईतील एकाकडून, तर धमकीचे पत्र शिंदेकडून मिळविले होते

Sachin Vaze: Gelatin sticks, threatening letters kept in Scorpio by Vaze, NIA probe reveals | Sachin Vaze : वाझेनेच स्काॅर्पिओत ठेवल्या जिलेटीनच्या कांड्या, धमकीचे पत्र, एनआयएच्या तपासातून उलगडा

Sachin Vaze : वाझेनेच स्काॅर्पिओत ठेवल्या जिलेटीनच्या कांड्या, धमकीचे पत्र, एनआयएच्या तपासातून उलगडा

Next

- जमीर काझी 
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात पार्क केलेल्या स्काॅर्पिओमध्ये निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेनेच जिलेटीनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र नेऊन ठेवले होते, हे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासातून स्पष्ट झाले आहे. २४ फेब्रुवारीला रात्री सुरुवातीला त्याने कार पार्क केली आणि त्यानंतर पाठीमागे असलेल्या इनोव्हामधून उतरून हे कृत्य केले होते.

एनआयएच्या तपास पथकाने  यासंबंधी १७ फेब्रुवारीपासून ते ५ मार्चपर्यंतच्या सर्व घटना व त्यांच्या गुन्ह्याची  सर्व संगती जुळवली आहे. गाडीत ठेवलेल्या २० जिलेटीनच्या कांड्या  नागपूरमधील एका कंपनीच्या असून, वाझेने त्या वसईतील एकाकडून, तर धमकीचे पत्र शिंदेकडून मिळविले होते,  असा उलगडा तपासाअंति झाला, स्काॅर्पिओ चालक  व जिलेटीनच्या कांड्या पुरविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाझेच्या सांगण्यानुसार हिरेन यांनी १७ फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड ऐरोली येथे  तांत्रिक बिघाड झाल्याचे भासवून स्काॅर्पिओ रस्त्याच्या बाजूला लावली. हिरेन यांनी मुंबईला जाऊन  गाडीची किल्ली  वाझेला दिली आणि दुसऱ्या दिवशी विक्रोळी पोलीस ठाण्यात जाऊन चोरीला गेल्याची तक्रार दिली. त्यापूर्वी  वाझेने ती गाडी एकाला तेथून  घेऊन जाण्यास सांगितले. त्याने ती ठाणे, साकेत कॉम्प्लेक्समध्ये पार्क केली. १९ फेब्रुवारीला स्काॅर्पिओ पुन्हा  मुंबई पोलीस आयुक्तालयात आणून त्यानंतर पुन्हा रात्री ती नेली.  २४ फेब्रुवारीला मुंबईत आणून कारमायकल रोडवर पार्क केली. त्यावेळी मागे वाझे पांढऱ्या रंगाची इनोव्हा घेऊन होता. स्कॉर्पिओ पार्क केल्यानंतर दोघे मुलुंड टोलनाका पार करत ठाण्याच्या दिशेने गेले.

काही वेळानंतर इनोव्हाची नंबर प्लेट बदलून वाझे पुन्हा आला व त्याने जिलेटीनच्या कांड्या, पत्र स्कॉर्पिओत  ठेवले व निघून गेला. बनावट नंबरप्लेट, सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजची हार्ड डिस्क आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू मिठीत नदीत फेकल्या. याबाबी तपासातून उघड झाल्या आहेत.  

हजार तासांच्या फूटेजची सूक्ष्म तपासणी
तपासासाठी  एनआयए व एटीएसने सीसीटीव्ही फूटेज महत्त्वाचा आधार ठरला आहे. त्यासाठी मुंबई, ठाण्यातील सर्व प्रमुख मार्ग, नाक्यावरील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले. जवळपास हजार तासांच्या फूटेजची सूक्ष्म तपासणी केली आहे. त्यातून या गुन्ह्याचा उलगडा झाला. 

‘कल्चर हाउस’मध्ये झाडाझडती
 एनआयएच्या पथकाने गुरुवारी सकाळी गिरगाव येथील बाबुलनाथ मंदिराजवळील कल्चर हाउस या हॉटेलवर छापा टाकला. तेथील मॅनेजर देबी सेनला ताब्यात घेतले. 
 सोनी बिल्डिंगमधील या हॉटेलमध्ये आरोपीची बैठक झाली होती, त्यामुळे तेथील व्यवस्थापकाकडे विचारणा करण्यात येत आहे. 
 तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले. तपासणीवेळी १००वर गिऱ्हाईक होते, त्यांना बाहेर काढून झडती घेण्यात आली.

Web Title: Sachin Vaze: Gelatin sticks, threatening letters kept in Scorpio by Vaze, NIA probe reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.