Sachin Vaze : जोरदार दणका देत सचिन वाझेची अखेर पोलीस सेवेतून हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 07:30 PM2021-05-11T19:30:37+5:302021-05-11T19:32:07+5:30
Sachin Vaze : मुंबई पोलीस आयुक्तांनी भारतीय राज्यघटनेच्या तरतुद ३११(२) (ब) अन्वये आज आदेश जारी केला आहे. त्यामुळे मोठा झटका सचिन वाझेला बसला आहे.
मुंबई - अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात अटकेत असलेले निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी भारतीय राज्यघटनेच्या तरतुद ३११(२) (ब) अन्वये आज आदेश जारी केला आहे. त्यामुळे मोठा झटका सचिन वाझेला बसला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओत सापडलेल्या स्फोटक प्रकरणात एनआयएने सचिन वाझेला अटक केल्यानंतर सेवेतून हकालपट्टी करण्याच्या प्रक्रियेच्या हालचालींना मुंबई पोलिसांकडून वेग आला आहे. सचिन वाझेंची शेवटची पोस्टिंग विशेष शाखेत झाली होती, त्यामुळे ही प्रक्रिया संबंधित विभागाची जबाबदारी असल्याची मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं.
काही दिवसांपूर्वीच विशेष शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील कोल्हे यांनी महाराष्ट्र एटीएस आणि एनआयएला पत्र लिहून सचिन वाझेंच्या या प्रकरणातील समावेशासंबंधित कागदपत्रांची मागणी केली होती, ज्याच एफआयआर कॉपीचाही उल्लेख होता. हे कागदपत्र सोमवारीच विशेष शाखेला सोपवण्यात आले आहेत. नंतर विशेष शाखेचे अधिकारी यावर आपला अहवाल बनवून राज्य सरकारला सोपवेल आणि वाझेंवर भा. दं. वि. 1949 च्या कलम 311 अंतर्गत कारवाई करण्याची परवानगी मागतील, अशा चर्चा होती. मात्र अखेर आता सचिन वाझेला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
मुंबई - अँटिलीया आणि मनसुख हिरेन प्रकरणातील NIA ने अटक केलेल्या सचिन वाझेला मुंबई पोलीस दलातून केले बडतर्फ pic.twitter.com/cO9SFEtXf3
— Lokmat (@MiLOKMAT) May 11, 2021
वाझेच्या सूचनेनुसार रियाज काझी पुरावे नष्ट करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मात्र NIA ने भा. दं. वि. कलम ३०२, २०१, २८६, ४६५, ४७३, १२० (ब), ३४आणि UAPA कायद्याच्या कलम ४ (अ)(ब)(आय) अन्वये काझीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताडदेव सशस्त्र पोलीस दलात नेमणूक केलेल्या काझीचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे १० एप्रिलपासून पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती सशस्त्र पोलीस दलाचे अप्पर पोलीस आयुक्त वीरेंद्र मिश्र यांनी माहिती दिली होती. त्यानंतर कांदिवली गुन्हे शाखेच्या कक्षात काम करणाऱ्या पोलीस अधिकारी सुनील मानेला देखील NIA ने बेड्या ठोकल्या आहेत.