Sachin Vaze : सचिन वाझे यांना घेऊन NIA ची टीम पोहचली ठाण्यातील घरी; 'त्या' बॅगेत काय दडलंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 08:55 PM2021-03-17T20:55:18+5:302021-03-17T20:56:17+5:30
Sachin Vaze : या टीममध्ये एक महिला अधिकारी देखील आहे. तसेच आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास NIA ची दुसरी टीम वाझेंना मुंबईतुन ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समध्ये पोहचले.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी(Mukesh Ambani Bomb Scare) आढळली, या प्रकरणात सध्या NIA कडून तपास सुरु आहे, यात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. NIA ने सचिन वाझे यांना शनिवारी १२ तासांच्या चौकशीनंतर अटक केली.सचिन वाझे प्रकरणामुळे ठाकरे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे, NIA तपासाची जोरदार चक्रे फिरवली आहेत. ठाण्यातील वाझे यांचे घर असलेल्या साकेत कॉम्प्लेक्समध्ये NIA अनेकदा तपासासाठी जात आहे. आज देखील दुपारच्या सुमारास ८ जणांची टीम तेथे धडकली. या टीममध्ये एक महिला अधिकारी देखील आहे. तसेच आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास NIA ची दुसरी टीम वाझेंना मुंबईतुन ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समध्ये पोहचले.
NIA चे ८ अधिकारी दोन इनोव्हातून सचिन वाझे यांच्या घरी साकेत कॉम्प्लेक्समध्ये पोहचले. आत गाड्या उभे केल्या. या NIA च्या चमूत एक महिला अधिकारी देखील उपस्थित होती. या आठ जणांपैकी एकजण बॅग घेऊन कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश करताना आढळून आलं असून त्या बॅगेत नेमकं काय होतं याचा खुलासा अजून झालेला नाही. NIA टीम घरात वझे कुटुंबियांशी मनसुख हिरेन प्रकरणात माहिती घेत आहे. गेले अनेक तास NIA ची टीम साकेत कॉम्प्लेक्स येथे असताना रात्री ८ वाजताच्या सुमारास मुंबईतून NIA दुसरी टीम सचिन वाझे यांना घेऊन साकेत कॉम्प्लेक्समध्ये पोहचली आहे.
सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास NIA ची टीम मुंबईतील कार्यालयातून सचिन वाझे यांना घेऊन बाहेर पडली. सिन रिक्रीएट करण्याच्या पार्श्वभूमीवर वाझेंनी घेऊन NIA टीम बाहेर पडली अशी चर्चा होती. मात्र, प्रथम टीम वाझेंनी घेऊन बाबुलनाथच्या दिशेने गेली. नंतर माहीम खाडीजवळ वाझेंना गाडीतून खाली उतरून NIA चे सुप्रिडेंट विक्रम खलाटे आणि टीमने काही प्रश्न विचारले. त्यानंतर वांद्रे परिसरातून थेट NIA ची दुसरी टीम वाझेंनी घेऊन ठाण्याकडे साकेत कॉम्प्लेक्स येथे पोहचली आहे.