Sachin Vaze: सचिन वाझेंना CIU प्रभारी नेमण्यासाठी योजनाबद्ध खेळी; पोलीस इतिहासात पहिल्यांदाच घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 03:25 AM2021-03-22T03:25:46+5:302021-03-22T03:26:04+5:30
वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली; नियुक्तीच्या दिवसापासूनच होता असंतोष, तक्रारीनंतरही कारवाई झाली नव्हती
जगदीश जोशी
नागपूर : अँटिलिया प्रकरणात अटक केलेले एपीआय सचिन वाझे यांना सीआययू प्रभारी करण्यात आल्यापासूनच मुंबई गुन्हे शाखेत असंतोष होता. वाझे यांना सीआययू प्रभारी करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाजूला करण्यात आले होते. सीआययूच्या इतिहासात पहिल्यांदाच एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला प्रभारी करण्यात आले होते. त्यामुळे नाराज अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही वाझे यांना कायम ठेवण्यात आले होते.
ख्वाजा युनुस प्रकरणात निलंबित वाझे यांना पोलीस सेवेत परत घेण्यात आल्यानंतर ९ जून २०२० रोजी गुन्हे शाखेच्या सीआययूमध्ये प्रभारी करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, वाझे यांच्या नियुक्तीपूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाचे दोन अधिकारी सीआययूमध्ये होते. वाझे यांचा रस्ता मोकळा करण्यासाठी सुरुवातीला त्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना हटवण्यात आले. निलंबित अधिकाऱ्याला सेवेत परत घेतल्यानंतर सुरुवातीला कंट्रोल रूम, एसबी अशा ठिकाणी नियुक्ती दिली जाते. सीआययू गुन्हे शाखेचा सर्वात महत्त्वाचा विभाग आहे.
या विभागाला गोपनीय कारवाई किंवा अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारीच सोपवली जाते. मुंबई गुन्हे शाखेने या आधारावरच अनेक उपलब्धी मिळवल्या आहेत. अशा परिस्थितीत वाझे यांना सीआययू येथे नियुक्ती दिल्यामुळे गुन्हे शाखेत असंतोष पसरला होता. यासंदर्भात तक्रारी करणाऱ्यांना गप्प करण्यात आले होते. वाझे यांनी सीआययूमध्ये येताच संशास्पदरीत्या काम करायला सुरुवात केली. परिणामी, काही अधिकाऱ्यांनी बेनामी तक्रारी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाझे यांच्यापासून सावधान राहण्यास सांगितले. त्यानंतर वाझे यांची नियुक्ती योग्य असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. वाझे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फटकून वागत होते. तसेच, थेट पोलीस आयुक्तांना संपर्क करीत होते, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
काही अधिकाऱ्यांनी बेनामी तक्रारी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाझे यांच्यापासून सावधान राहण्यास सांगितले. वाझे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फटकून वागत होते.थेट पोलीस आयुक्तांना संपर्क करीत होते. त्यामुळे संपूर्ण गुन्हे शाखेने त्यांच्यापुढे गुडघे टेकले होते, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.