Sachin Vaze Remanded till 25 march : सचिन वाझेंना कोर्टाने सुनावली 11 दिवसांची NIA कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 04:00 PM2021-03-14T16:00:30+5:302021-03-14T16:01:08+5:30
Sachin Vaze Remand: आज सुट्टीकालीन कोर्टात ४० मिनिटं युक्तिवाद करण्यात आला.
२५ फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार प्रकरणी एनआयएने शनिवारी रात्री ११.५० वाजता सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. काल १३ तास NIA कडून सचिन वाझे यांची झाडाझडती घेण्यात आली. आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टात सुट्टीकालीन खंडपीठासमोर दाखल करण्यात आले. कोर्टाकडे NIAने १४ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र सचिन वाझे यांना 11 दिवसाची NIA कोठडी कोर्टाने सुनावली आहे.त्यामुळे पुन्हा वाझे यांना २५ मार्चला NIA कोर्टात रिमांडसाठी हजर करण्यात येईल. आज सुट्टीकालीन कोर्टात ४० मिनिटं युक्तिवाद करण्यात आला.
सचिन वाझे यांचे वकिलांनी कोणतेही ठोस पुरावे नसताना अटक केली असून केवळ संशयावरून अटक केली असल्याचा युक्तिवाद कोर्टात केला. तर NIA ने सखोल चौकशी करण्यासाठी कोठडीची मागणी केली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएने अटक केली आहे. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. तसेच सचिन वाझेंच्या अटकेनंतर ठाण्यातून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाचा समावेश असल्याचे सांगितले जाते.
मुंबई - सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने सचिन वाझे यांना ११ दिवसांची NIA कोठडी सुनावली pic.twitter.com/h7fPQpH6uU
— Lokmat (@MiLOKMAT) March 14, 2021
सचिन वाझे यांच्या अटकेमुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे. आता NIA कडून सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाझ काझी यांची गेल्या ५ तासांपासून चौकशी सुरु आहे. NIA सचिन वाझे यांचे जवळचे मित्र रियाझ काझी यांच्या चौकशीनंतर CIU विभागातील आणखी काही पोलिसांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच विक्रोळी पोलीस ठाण्यातील पोलिस देखील NIA च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण, १८ फेब्रुवारीला विक्रोळी पोलिसांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे आणि कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावरून स्कॉर्पिओ चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली गेली, याचा तपास NIA करू शकते.