Sachin Vaze : मोबाईल घरी ठेवून सचिन वाझे आलेले NIA कार्यालयात जबाब नोंदवायला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 08:26 PM2021-03-16T20:26:04+5:302021-03-16T20:26:57+5:30
Sachin Vaze : वाजे यांच्या वकिलाने आणखी एक चिंता व्यक्त केली ती म्हणजे एनआयएच्या चौकशी कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया निवास्थानाबाहेर स्फ़ोटकांसह स्कॉर्पिओ कार प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA ) शनिवारी उशिरा रात्री निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी बेड्या ठोकल्या. कोर्टाने त्यांना २५ मार्चपर्यंत NIA कोठडी सुनावली असून NIA ने या तपासासाठी कंबर कसली आहे. मात्र, चौकशीत सचिन वाझे NIA सहकार्य करत नसल्याची माहिती कोर्टात NIA ने दिली आहे. तसेच NIA ने विशेष न्यायालयात सचिन वाझे यांनी NIAच्या कार्यालयात येताना स्वत:चा मोबाईल फोन देखील आणला नसल्याचे सांगितले आहे.
मोबाईल फोन घरी राहिल्याचे सचिन वाझे यांनी NIA च्या अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, सचिन वाझे यांचे कुटुंबीयही देखील राहत्या घरी नसल्याने गायब असल्याचे म्हणणं आहे. गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे यांच्या ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समधील घरी कोणीच नाही. त्यामुळे NIA ला अद्याप वाझे यांच्या कुटुंबियांशी बोलता आलेले नाही.
विशेष एनआयए कोर्टाने सोमवारी सचिन वाजे यांच्या बेकायदेशीर अटकेबद्दल आणि अटकेच्या वेळी कायदेशीर सल्ल्यासाठी प्रवेश न देण्याबद्दलच्या अर्जावर सुनावणी पार पडली. वाझे यांचे वकील सुदीप पास्बोला यांनी कोर्टाला सांगितले की, वाझे यांना अटक झाल्यानंतर त्यांना कायदेशीर सल्ल्याच्या हक्क बजावण्याची परवानगी नव्हती आणि त्यांच्या कुटूंबालाही कळविण्यात आले नाही. "त्यांना शनिवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण नंतर रात्री त्याला अटक करण्यात आली. १०-१२ तास बेकायदेशीर कोठडीत ठेवण्यात आले होते," पास्बोला यांनी सांगितले.
पास्बोला यांना उत्तर देताना विशेष सरकारी वकील (एनआयए) सुनील गोन्साल्विस म्हणाले की, वाझे यांना संशयित म्हणून नव्हे तर तपास पथकाचा भाग म्हणून चौकशीसाठी बोलविण्यात आले असता त्यांचा मोबाईल फोन घेऊन आले नव्हते. "चौकशीसाठी आले असता आरोपीने आपला फोन आणला नव्हता. त्याला संशयित म्हणून नव्हे तर चौकशीसाठी बोलावले होते, वाझे तपासात सहकार्य करत नाहीत. त्यांनी आपल्या कुटूंबाचा फोन दिला नाही म्हणूनच त्यांच्या कुटुंबीय राहत असलेल्या हद्दीतील पोलिस ठाण्याला अटक झाल्याची माहिती देण्यात आली, ”असे गोन्साल्विस यांनी सांगितले. वाजे यांच्या वकिलाने आणखी एक चिंता व्यक्त केली ती म्हणजे एनआयएच्या चौकशी कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.
मात्र, काल रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ४ वाजेपर्यंत NIA चे पथक CIU कार्यालयात झाडाझडती घेत असताना सचिन वाझे यांचा मोबाईल हाती लागला आहे. मोबाइलसह वाझेंचा कॉम्प्युटर आणि कागदपत्रे देखील NIA हस्तगत केले आहे. पुरावे मिळविण्याच्या उद्देशाने NIA ने ही झाडाझडती घेतली. मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या समोर NIA ने CIU कार्यालयात सर्च ऑपरेशन केले आहे. त्यामुळे वाझे यांचं सत्य लवकरच उघडकीस येईल.