Sachin Vaze : सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर ३० मार्चला सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 07:28 PM2021-03-19T19:28:48+5:302021-03-19T19:30:32+5:30
Sachin Vaze : वाझे यांच्या बहिणीने अटकपूर्व जामिनासाठी ठाण्याच्या न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली.
मुंबई पोलीस दलातील दुसऱ्यांदा निलंबित केलेले अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता ३० मार्चला ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून (ATS) न्यायालयात आज याचिकेवर सुनावणी पार पडली आहे. वाझे यांच्या बहिणीने अटकपूर्व जामिनासाठी ठाण्याच्या न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान एटीएसने या आपले उत्तर न्यायालयात दाखल केले आहे.
कोर्टाबाहेर पत्रकारांशी बोलताना सचिन वाझे यांचे वकील आरती कालेकर म्हणाल्या, "कोठडीचा मुद्दा नाही. आम्ही आमच्या क्लायंटशी कोणते मुद्दे आहेत याबद्दल बोलू. सचिन वाझे यांच्या बहिणीने सांगितले आहे की, वाझे यांचे कुटुंबीय राहत असलेल्या ठिकाणी माध्यमांनी त्रास देऊ नये म्हणून देखील याचिका दाखल देखील आहे. वाझे यांच्या नातेवाईकांना त्रास दिला जात असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केले.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने (राष्ट्रीय तपास संस्था) मागील शनिवारी रात्री उशिरा मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली होती. एनआयएने दिवसभर वाझे यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. कंबाला हिल येथील ऑफिसमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास वाझे गेले होते. चौकशीनंतर रात्री ११.५० वाजता त्यांना अटक केली होती. त्यानंतर वाझे यांना २५ मार्चपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे.