Sachin Vaze: सचिन वाझे ‘या’ आजाराने त्रस्त; जे. जे हॉस्पिटलचा मेडिकल रिपोर्ट समोर, उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 06:21 PM2021-03-15T18:21:26+5:302021-03-15T18:25:08+5:30
Sachin Vaze Medical Report: सचिन वाझेंना आधीपासून हा त्रास होता, सचिन वाझे यांना पुन्हा उपचारानंतर NIA कार्यालयात नेण्यात आलं आहे.
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण(Mukesh Ambani Bomb Scare) गाजत आहे, या प्रकरणात NIA ने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे, सध्या या प्रकरणी विविध पैलुने तपास करण्यात येत आहे, तत्पूर्वी सचिन वाझे यांची तब्येत खालावल्याने त्यांना जे जे हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी हलवण्यात आलं होतं. (An Medical examination at JJ Hospital revealed that Sachin Vaze had diabetes)
जे जे हॉस्पिटलच्या तपासणीवेळी सचिन वाझे यांना मधुमेह(Diabetes) असल्याचं समोर आलं आहे, त्यामुळे आता वाझेंवर जे जे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. मेडिकल रिपोर्टमध्ये सचिन वाझेंना मधुमेह असल्याचं उघड झालं आहे, अशी बातमी टीव्ही ९ ने दिली आहे. सचिन वाझेंना आधीपासून हा त्रास होता, सचिन वाझे यांना पुन्हा उपचारानंतर NIA कार्यालयात नेण्यात आलं आहे. अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.
सचिन वाझे पुन्हा निलंबित
NIA च्या या कारवाईनंतर आता सचिन वाझेंचं पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याला ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडी मिळाल्यास त्याचे निलंबन केले जाते. याचपार्श्वभूमीवर कारवाई करवाई करण्यात आली आहे. सचिन वाझेंचं पोलीस सेवेतून दुसऱ्यांदा निलंबन झाले आहे. अंबानींच्या घराजवळ कार नेऊन ठेवण्यामागील उद्देश काय होता? भीती दाखवून त्यांना काय साध्य करायचे होते, याचा तपास सुरू आहे. केवळ स्वतःच्या हिमतीवर वाझे इतके मोठे धाडस करू शकत नाहीत, त्यांच्या पाठीशी वरिष्ठ अधिकारी व राजकीय वरदहस्त असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. ते कोणाच्या संपर्कात होते, याची माहिती घेतली जात आहे. याचदरम्यान आता महत्वाची माहिती एनआयएच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे.
‘ती’ इनोव्हा क्राईम ब्रँचचीच
अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाची इनोव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होती. ही गाडी क्राईम ब्रँचच्याच वाझे कार्यरत असलेल्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू)ची असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ती गाडी जप्त केली.
वाझेंच्या विरोधात एनआयएकडे भक्कम पुरावे
वाझेंच्या विरोधात काही भक्कम पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. वाझे वापरत असलेली गाडी २४ फेब्रुवारी आणि १३ मार्चला मुंबईतल्या पोलीस मुख्यालयातून बाहेर पडताना दिसत आहे. हे दोन्ही सीसीटीव्ही फुटेज एनआयएकडे आहेत. वाझे यांच्याकडे असलेली इनोव्हा कार २४ मार्चला ठाण्यात गेली. याच दिवशी कारची नंबर प्लेट बदलली गेल्याचा संशय एनआयएला आहे.