Sachin Vaze: सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार, कोर्टाने अर्ज केला मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 04:31 PM2022-06-01T16:31:33+5:302022-06-01T16:42:52+5:30
Sachin Vaze: १०० कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये सध्या तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय कोर्टात दाखल केलेला अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे.
मुंबई - १०० कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये सध्या तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय कोर्टात दाखल केलेला अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. काही अटीशर्तींसह कोर्टाने हा अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनविण्याची मागणी केली होती. सचिन वाझेंने याबाबत विशेष सीबीआय कोर्टात अर्जही दाखल केला होता. सीबीआयने त्याच्या अर्जाला सशर्त मंजुरी दिली असून त्यावर कोर्टाने आज निर्णय दिला आहे.
दरम्यान, आधीच्या सीबीआय चौकशीमध्ये सचिन वाझे याने अनेक गंभीर गौप्यस्फोट केले होते. गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी पदाचा गैरवापर केला होता, असा दावा सचिन वाझे याने चौकशीमध्ये केला होता. दरम्यान, या १०० कोटी वसुली प्रकरणामध्ये वाझे माफीचा साक्षीदार होणार आहेय त्यामुळे अनिल देशमुखांसह इतर आरोपींच्या अडचणी वाढणार आहेत. तसेच १०० कोटींच्या वसुलीबाबत सबळ पुरावे दिल्य़ाची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेला सर्व तरतुदी त्याचप्रमाणे कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. विशेष सीबीआय कोर्टाने सचिन वाझेचा अर्ज स्वीकारल्याने आता त्यांचा जबाब फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवला जाईल. तसेच इतर आरोपींविरुद्ध पुरावे वापरले जाऊ शकतात.