सचिन वाझे, सुनिल मानेसमाेर हाेणार प्रदीप शर्माची चाैकशी; एनआयएकडून झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 08:01 AM2021-06-20T08:01:44+5:302021-06-20T08:02:02+5:30
एनआयएने गुरुवारी शर्मासह तिघांना अटक केली. हिरेनची हत्या करण्याचा कट त्याने वाझेसमवेत केला होता.
मुंबई : कारमायकल रोड स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने अटक केलेल्या वादग्रस्त माजी पोलीस एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माकडे कसून चौकशी सुरू आहे. गुन्ह्यातील त्याचा सहभाग स्पष्ट झाला असून, या प्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे व सुनील माने या खात्यातील बडतर्फ अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे त्याच्यासमोर बसवूनही चौकशी केली जाणार असल्याचेही एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एनआयएने गुरुवारी शर्मासह तिघांना अटक केली. हिरेनची हत्या करण्याचा कट त्याने वाझेसमवेत केला होता. संतोष शेलार, आशिष जाधव, सतीश मोठकरू व मनीष सोनी यांना हिरेनला मारण्याची सुपारी दिल्याचे त्याच्या जबाबातून स्पष्ट झाले. या तिघांना २८ जूनपर्यंत कोठडी मिळाल्याने त्याच्याकडून गुन्ह्याचा हेतू जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शर्मा यातला मास्टरमाईंड नसला तरी त्याची भूमिका महत्त्वाची असल्याने मास्टरमाईंडपर्यंत पोहचण्यासाठी मदत होऊ शकते, त्यामुळे तपास यंत्रणा शनिवारपासून त्याच्याकडे कसून विचारणा करत आहे. न्यायालयीन कोठडीतील वाझे व सुनील माने यांना त्याच्या समोरासमोर बसवून विचारणा केली जाणार आहे.