सचिन वाझेचा सहकारी काझीची रवानगी न्यायालयीन कोठडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 07:08 AM2021-04-17T07:08:25+5:302021-04-17T07:08:48+5:30
Sachin Vaze : स्फोटक कार प्रकरणाच्या कटात सहभाग आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासाअंती समाेर आल्यानंतर काझीला १० एप्रिल रोजी अटक करण्यात आली.
मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणात अटक करण्यात आलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे याचा साथीदार, सहायक पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन हिसाझुद्दीन काझी याची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
वाझेच्या अटकेनंतर काझी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर होता. त्याची वेळोवेळी चौकशी करण्यात आली. स्फोटक कार प्रकरणाच्या कटात सहभाग आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासाअंती समाेर आल्यानंतर काझीला १० एप्रिल रोजी अटक करण्यात आली. शुक्रवारी त्याची कोठडी संपत असल्याने त्याला विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले.
एनआयएने चौकशी पूर्ण झाल्याचे सांगत त्याच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
काझी हा २०१० च्या पीएसआय बॅचमधील पोलीस अधिकारी आहे. त्याची पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक पदावरून सहायक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर काझीची गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागात (सीआययू) नियुक्ती करण्यात आली. ९ जूनला सचिन वाझेने सीआययू पथकाचे प्रभारी म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून काझी हा वाझेसोबत काम करत होता. त्याचा जवळचा साथीदार, अशी त्याची ओळख हाेती.
...त्यानंतर बदली
सीआययूने केलेल्या अनेक महत्त्वाच्या कारवाईत तो वाझेसोबत हाेता. वाझे प्रकरणानंतर गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. त्यात काझीची सशस्त्र पोलीस, नायगाव येथे बदली करण्यात आली होती. मात्र, त्याला अटक झाल्यामुळे अटकेच्या दिवसापासून सेवेतून निलंबित करण्यात आले.