बदलीनंतर सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया; क्राईम ब्रांचच्या सेवेतून मुक्त झालो!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 06:18 PM2021-03-12T18:18:50+5:302021-03-12T18:19:44+5:30
Free from Crime Branch service : बदलीनंतर वाझे यांनी क्राईम ब्रांचच्या सेवेतून मुक्त झालो अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : मनसुख हिरन मृत्यू प्रकरणांत चौकशीच्या घेऱ्यात अडकलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे सचिन वाझे यांची विशेष शाखा १ मध्ये बदली करण्यात आली असून, नागरी सुविधा केंद्र विभागाचा (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर ) पदभार त्यांच्याकड़े देण्यात आला आहे. अशात बदली नंतर, 'मी गुन्हे शाखेच्या सेवेतून मुक्त झालो' असे वाझे यांनी सांगितले आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडली. याचा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला. या स्कॉर्पिओ कारचा ताबा असलेल्या ठाण्यातील व्यापारी मनसुख यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. विरोधी पक्षाने त्यांचे निलंबन करुन अटकेची मागणी केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला.
विरोधकाच्या आक्रमक पवित्र्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गृहमंत्र्यांनी वाझे यांची बदली करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वाझे यांची बदली कुठे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, शुक्रवारी त्यांची विशेष शाखा १ येथे बदली करण्यात असून त्यांच्याकड़े नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अशात बदली झाल्यानंतर वाझे यांनी प्रतिक्रिया देताना, मी क्राईम ब्रान्चच्या सेवेतून मुक्त झालो असे सांगत जास्त बोलणे टाळले.
सचिन वाझेंची ATS कडून 10 तास चौकशी
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली आहे. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली. महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. यानंतर सचिन वाझेंनी ATS ने दहा तास चौकशी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाझेंवर अनेक आरोप होत होते. या आरोपानंतर वाझे स्वत: हून ATS च्या समोर गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय म्हणाले होते अनिल देशमुख?
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. सचिन वाझे असो वा कुणीही, शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही. विरोधकांनी त्यांच्याकडील पुरावे एटीएसला द्यावेत, तसंच सचिन वाझे यांची बदली करण्यात येत असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी विधानपरिषदेत सांगितले होते.