दुःखद घटना! मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 08:50 PM2021-08-22T20:50:50+5:302021-08-22T20:54:51+5:30
Farmer Suicide : या काही वर्षांपूर्वी शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्येची घटना समोर आली होती.
20 ऑगस्टला मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांचा प्राण वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. मात्र, त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील जिटी रुग्णलायात त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती त्यांचे पुत्र गणेश जाधव यांनी दिली. या काही वर्षांपूर्वी शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्येची घटना समोर आली होती.
सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील रहिवासी आहेत. ते शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुंबईत मंत्रालय परिसरात आले होते. यावेळी ते गार्डन गेटजवळ येऊन छोट्या बाटलीतील कीटनाशक प्यायले. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. यावेळी ते तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून जाधव यांनी आपली व्यथा मांडली होती. त्यामध्ये आपल्यासोबत कशाप्रकारे अन्याय झाला, याची व्यथा मांडली होती. आरोपींनी आपल्याला व कुटुंबियांना मारहाण करुन, अर्धनग्न करुन जमीन बळकावली, असा आरोप त्यांनी केला होता.
सुभाष जाधव यांच्या जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाली होती. त्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती. पण तिथे योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ते अस्वस्थ होते. आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी मंत्रालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते शुक्रवारी मुंबईत मंत्रालय परिसरात आले. तिथे त्यांनी मंत्रालयात जाण्याचा प्रवेश केला. पण त्यांना मंत्रालयात आत प्रवेश करण्यासाठी मज्जाव करण्यात आला. त्यामुळे त्यांनी मंत्रालयाच्या गेटसमोरच कीटनाशके पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे यावरून विरोधक धारेवर धरतील अशी चर्चा आहे.