मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक! महिलेला सहार पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 02:35 AM2019-06-25T02:35:39+5:302019-06-25T02:35:54+5:30
मंत्रालय, तसेच विधानभवनमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या महिलेला मुंबईत अटक करण्यात आली. सहार पोलिसांनी ही कारवाई केली असून, या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई - मंत्रालय, तसेच विधानभवनमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या महिलेला मुंबईत अटक करण्यात आली. सहार पोलिसांनी ही कारवाई केली असून, या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शीतल रामदास निर्भवणे उर्फ शीतल मनोहर निकम असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. कर्ज मिळवून देण्याचे आमिष तिने तक्रारदाराला दिले होते. त्यानंतर, त्यांना रजिस्ट्रेशनचे पैसे भरावे लागतील, असे तिने सांगितले. कर्ज मिळेल, या आशेने तक्रारदाराने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तिला अडीच लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर, त्यांना ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली, तसेच तिने कोणतेही कर्ज त्यांना दिले नाही. त्यामुळे तक्रारदाराने त्यांचे पैसे परत मागितले. मात्र, तेदेखील तिने परतवले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी महिलेविरोधात सहार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
मंत्रालयात आणि विधानभवनात माझी ओळख असून, मी त्या ठिकाणी नोकरी मिळवून देते, असे सांगत, तिने आणखी एकाला गंडा घालत त्याच्याकडून पाच लाख रुपये उकळले. मात्र, त्यालाही नोकरीला लावले नाही. त्यानुसार, तिच्या विरोधात आणखी एक तक्रार सहार पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी तिला अटक केली.
तिच्यावर एम.आर.ए. मार्ग, दादर, पवई, अंबड, नाशिक, भांडुप आणि कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
तुमचीही फसवणूक झाली आहे का?
तिने अशाप्रकारे अनेकांनी फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे तिच्या आमिषाला बळी पडलेल्या नागरिकांनी सहार पोलिसांकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.