सख्खा भाऊ पक्का वैरी! शेतीच्या वादातून मोठ्या भावाने घातला धाकट्या भावावर कुऱ्हाडीने घाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 11:09 PM2020-06-16T23:09:30+5:302020-06-16T23:13:40+5:30
धानवड येथील घटना, याप्रकरणी सोमवारी रात्री साडे आठ वाजता भाऊ, वहिणी व पुतण्या अशा तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव : शेतीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता धानवड, ता.जळगाव येथे घडली. या हल्ल्यात जितेंद्र नाटू पाटील हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मोठा भाऊ गोरख नाटू पाटील, पत्नी शोभाबाई व मुलगा पवन या तिघांविरुध्द मंगळवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, जितेंद्र पाटील हे डोमगाव येथील आश्रमशाळेत शिक्षक म्हणून नोकरीला आहेत. मोठा भाऊ गोरख हा धानवड येथे वास्तव्याला आहे. २००६ मध्ये वडीलांचे निधन झाले आहे. गावातील सात एकर शेती दोन वर्षापासून स्वत: कसत असून उर्वरित शेती मोठा भाऊ करीत आहे. गेल्या काही दिवसापासून दोन्ही भावांमध्ये किरकोळ वाद सुरु आहेत. जितेंद्र पाटील हे पत्नीला सोबत घेऊन शेतात मक्याची लागवड करीत असताना तेथे मोठा भाऊ गोरख, त्याची पत्नी शोभा व मुलगा पवन आले होते. तुम्ही येथे कशी काय पिकाची लागवड करीत आहेत, असे म्हणत जितेंद्र यांच्या हातावर कुऱ्हाडीने घाव घातला, त्यानंतर शोभाबाई व पवन यांनीही मारहाण केली. या वादात तिघांपैकी कोणीतरी खिशातील १० हजार रुपये काढून घेतले. यावेळी नंदलाल पाटील व विनोद पाटील यांनी धाव घेऊन जितेंद्र पाटील यांना शहरातील खासगी दवाखान्यात दाखल केले. याप्रकरणी सोमवारी रात्री साडे आठ वाजता भाऊ, वहिणी व पुतण्या अशा तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.