सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह पुरला, सात महिन्यानंतर उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 11:43 PM2024-01-11T23:43:43+5:302024-01-11T23:44:12+5:30

चंदन दीपचंद हिंगणकर (४०), मनोहर कवडू दुधबरवे (४८) अशी आरोपींची नावे आहेत, तर विलास हिंगणकर (५०) असे मृताचे नाव आहे. 

Sakhkhya killed his brother and buried his body, revealed after seven months | सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह पुरला, सात महिन्यानंतर उलगडा

सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह पुरला, सात महिन्यानंतर उलगडा

नागपूर : मालमत्तेच्या वादातून एका व्यक्तीने मित्राच्या मदतीने सख्ख्या मोठ्या भावाचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तब्बल सात महिन्यांनी सत्य बाहेर आले आहे. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी मृतक व्यापाऱ्याचा भाऊ आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. चंदन दीपचंद हिंगणकर (४०), मनोहर कवडू दुधबरवे (४८) अशी आरोपींची नावे आहेत, तर विलास हिंगणकर (५०) असे मृताचे नाव आहे. 

दोघांच्याही भावांना निवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळाली. या रकमेतून हिंगणकर बंधूंनी कोराडी येथील सुरादेवी येथे चार एकर जमिनीवर सिमेंटच्या विटा तयार करण्याचे काम सुरू केले. यासोबतच त्यांनी रेती-गिट्टी, मातीची कामेही सुरू केली. त्यांनी वाहतुकीसाठी टिप्परही भाड्याने घेतले. हा सगळा व्यवसाय विलास चालवत होता. तो आक्रमक स्वभावाचा होता. व्यवसाय तोट्यात चालला होता. यामुळे वडिलोपार्जित संपत्ती विकावी लागली व कर्जदेखील झाले होते. चंदनने हिशेब विचारल्यावर विलास शिवीगाळ करत मारहाण करायचा. यामुळे चंदनला अपमानित वाटायचे. विलासने चंदनला न सांगता आईच्या नावावर असलेली मालमत्ता विकली आणि चंदनला त्याचा हिस्साही दिला नाही. यामुळे चंदन संतापला होता. 

विलाससोबत त्यांचे अनेकदा वाद होऊ लागले. त्यातूनच त्याने विलासची हत्या करण्याचे ठरवले. ८ जून २०२३ रोजी रात्री चंदन त्याचा साथीदार मनोहरसोबत सुरादेवीला पोहोचला. नियोजनानुसार दोघांनी विलासचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह लपवून ठेवला. शौचालयाचा खड्डा खोदण्याच्या बहाण्याने चंदनने जेसीबी मागवला. तसेच मृतदेह दफन करण्यासाठी पाच किलो मीठ विकत घेतले. मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून रात्रीच दफन करण्यात आला. विलासच्या परिसरात बाहेरील लोकांची ये-जा नसल्याने घटनेबाबत कुणालाच शंका आली नाही. विलास हा पत्नीवरही अत्याचार करायचा. त्यामुळे २०१७ मध्ये त्याची पत्नी मुलगा व मुलीसह भावाकडे रहायला गेली. 

संवादाअभावी त्यांनाही विलासच्या खुनाची माहिती मिळू शकली नाही. विलास अचानक बेपत्ता झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्याच्याशी संबंधित लोकांनी चंदनला विचारायला सुरुवात केली होती. चंदनचे वागणे आणि उत्तरे ऐकून लोकांचा संशय बळावला. त्यांनी परिमंडळ पाचचे उपायुक्त निकेतन कदम यांच्या पथकाला ही माहिती दिली. एसीपी संतोष खांडेकर यांनी चंदनला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली. कसून चौकशी केली असता त्याने मनोहरच्या मदतीने विलासची हत्या केल्याची कबुली दिली.

आरोपींनी राखेने झाकला खड्डा
विलासच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर चंदनने विटा बनवण्याच्या नावाखाली राखेचे दोन ट्रक मागवले. मृतदेह दफन केलेल्या जागेत ती राख ठेवली. बुधवारी पोलिसांनी सर्वप्रथम राख दूर केली. गुरुवारी दुपारी तहसीलदारांच्या उपस्थितीत विलासचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनानंतर हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली.

Web Title: Sakhkhya killed his brother and buried his body, revealed after seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.