पहिल्या प्रियकराची एन्ट्री झाली अन् साहिल बनला हैवान; 'तिच्या' हत्येचे रहस्य उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 10:52 AM2023-05-30T10:52:57+5:302023-05-30T10:53:22+5:30
अल्पवयीन मुलगी तिच्या आधीच्या प्रियकरासोबत संपर्कात होती असा संशय साहिलला होता
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत अंगावर थरकाप उडवणारी घटना घडली. साहिल नावाच्या मुलाने १६ वर्षीय मुलीची चाकू भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या केली. या हत्येचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. त्यात आरोपी साहिलला पोलिसांनी अटक केली आहे. आता मुलीच्या हत्येच्या तपासातून अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती सापडत आहेत. मागील काही दिवसांपासून मुलगी तिच्या आधीच्या प्रियकराशी संपर्कात आली होती. त्यावरून साहिलसोबत तिचे भांडण सुरू होते. याच भांडणातून साहिलने तिची हत्या केल्याचे बोलले जाते.
काय आहे प्रकरण?
दिल्लीच्या शाहबाद डेअरी येथे २० वर्षीय साहिलने १६ वर्षीय मुलीची हत्या केली. या मुलाने क्रूररित्या मुलीला संपवले ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्यात साहिल कशाप्रकारे चाकूने मुलीवर वार करत असून त्यानंतर दगडाने ठेचून हत्या करत असल्याचे दिसत आहे.
का केली हत्या?
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी तिच्या आधीच्या प्रियकरासोबत संपर्कात होती असा संशय साहिलला होता. इतकेच नाही तर साहिल आणि त्या मुलीमध्ये भांडणही झाले होते. यावेळी साहिलने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुलगी तिच्या आधीच्या प्रियकरासोबत बोलायची. त्याच्याशी संबंध ठेवत होती. त्यामुळे साहिल आणि मुलीमध्ये वाद व्हायचे.
जून २०२१ पासून दोघे रिलेशनमध्ये होते
साहिल आणि अल्पवयीन मुलगी जून २०२१ पासून रिलेशनमध्ये होते परंतु काही दिवसांपासून साहिलसोबत तिने बोलायचे बंद केले होते. या दोघांमध्ये वाद सुरू होता. मुलीला साहिलसोबत ब्रेकअप करायचे होते. पण साहिल सातत्याने तिला भेटायचा प्रयत्न करायचा. शनिवारी दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर साहिलने तिचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. मुलीच्या हातावर प्रविण नावाचा टॅटू होता. साहिल आणि तिच्या भांडणाचे प्रमुख कारण तेच होते.
कोण आहे साहिल?
साहिल हा शाहबाद डेअरी इथं त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. त्याच्या कुटुंबात ३ बहिण, आई-वडील आहेत. साहिल मॅकेनिक होता तसेच एसी, फ्रिज दुरुस्त करायचा. साहिलच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून त्याचे दारूप्रेम सर्वश्रुत आहे. कधी हुक्का पिताना तो रिल बनवायचा. हत्येनंतर साहिल फरार झाला होता. परंतु त्याला बुलंदशहरातून पोलिसांनी अटक केली.