बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्री; 8 कोटींची फसवणूक करणाऱ्या विकासकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 03:44 AM2019-07-12T03:44:28+5:302019-07-12T03:44:37+5:30
ठाणे: मृत व्यक्तीच्या नावाने असलेल्या 194 गुंठे जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करुन तिची सात कोटी 90 लाखांमध्ये विक्री करुन ...
ठाणे: मृत व्यक्तीच्या नावाने असलेल्या 194 गुंठे जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करुन तिची सात कोटी 90 लाखांमध्ये विक्री करुन फसवणूक करणाऱ्या अरविंद जैन (47, रा. बदलापूर, जि. ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्याला 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
उल्हासनगर येथील रहिवाशी राजू चांदवाणी (63) यांनी यासंदर्भात 9 मे 2018 रोजी तक्रार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार कुळगाव बदलापूर विश्वनाथनगर येथील रहिवाशी असलेला जैन याने पांडूरंग विष्णू गाडे या मृत व्यक्तीच्या नावावर असलेली कल्याणच्या गौरीपाडा येथील 194 गुंठे जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार केली होती. याच कागदपत्रांच्या आधारे चांदवाणी यांना तिची विक्री करण्यासाठी समझोता करार बनविला. त्यासाठी चांदवाणी यांच्याकडून सात कोटी 90 लाखांची रक्कम स्वीकारून त्यांची फसवणूक केली.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जैन याचा मुंबई उच्च न्यायालयाने जामीनही रद्द केला होता. त्यानंतर तो पसार झाला होता. एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे 8 जुलै 2019 रोजी त्याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी त्याला ठाण्यातून अटक केली. त्याला कल्याण न्यायालयाने 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अपर पोलीस आयुक्त प्रविण पवार, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कदम हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.