आधारकार्डाच्या माहितीची विक्री, दोघांना अटक; गुन्हे शाखेच्या चौकशीत दिल्लीसह गुजरातमध्येही प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 12:35 PM2022-11-25T12:35:31+5:302022-11-25T12:36:17+5:30
Crime News: महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातमधील नागरिकांच्या आधारकार्डची माहिती चोरून त्याची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई : महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातमधील नागरिकांच्या आधारकार्डची माहिती चोरून त्याची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने बेड्या ठोकल्या आहेत. दोघांच्या चेंबूर येथून घरातून संगणक, लॅपटॉप, मोबाईल, सिम कार्ड जप्त करण्यात आले आहे. त्यातून आतापर्यंत हजारो नागरिकांचा डेटा चोरी केल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे. साळुंखे यांना गोपनीय खबऱ्याने माहिती दिली. दोघांनी ट्रीनाऊ डॉट को डॉट इन व डब्लूडब्लूडब्लू डॉट फोनिवोटेक डॉट कॉम अशा नावाच्या दोन वेबसाईट तयार केल्या आहेत.
याच, ॲप्लिकेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र, दिल्ली व गुजरात राज्यांतील नागरिकांची त्यांच्या नावावरून किंवा आधारकार्ड लिंक मोबाईल क्रमांकावरून त्यांचे संपूर्ण नाव, गाव, पत्ता सर्व जुने बंद झालेले व चालू असलेले मोबाईल क्रमांक ई-मेल आय.डी., जन्मतारीख, कुटुंबातील सदस्य यांची माहिती मिळत असल्याचे खबऱ्याने सांगितले.
त्यानुसार, पथकाने दोन्ही वेबसाईटवरून कशाप्रकारे माहितीची देवाण-घेवाण होते किंवा खरेदी-विक्री होते, यादृष्टीने अभ्यास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय पद्धतीने सातत्याने सलग दोन महिने केलेल्या प्रयत्नानंतर, आरोपींचे कार्यालय व निवासस्थान याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, तेथे लक्ष ठेवण्यात आले. हाती मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे छापा टाकून कारवाई करत दोघांना अटक करण्यात आली.
या कारवाईत त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण डेटा गुन्हे शाखेने जप्त केला आहे. दोघांना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
असे अडकले जाळ्यात
पोलिसांनी एका व्यक्तीला पंटर म्हणून तयार करत दोन्ही कंपनींचे आयडी आणि पासवर्ड विकत घेण्यास सांगितले. मात्र नवीन व्यक्तीला निखिल हा थेट आयडी पासवर्ड देत नव्हता.
अखेर पोलिसांनी यातील दुसरा आरोपी माटुंग्यातील रिकव्हरी एजन्सीचा मालक मेल्विन याच्याशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने निखिलकडून लाॅग इन आयडी आणि पासवर्ड मिळविला. पोलिसांनी त्यांच्या मदतीने वेबसाईटवरील उपलब्ध माहितीची खातरजमा केली.
कसा चोरायचे डेटा?
त्यांनी, या वेबसाईट कशा तयार केल्या? ते कशी माहिती चोरायचे? ते कुणाला हा डेटा विकत होते? आदींबाबत तपास सुरू आहे. या दोघांच्या संपर्कात कोण कोण होते? याबाबतही अधिक तपास सुरू आहे.
एका लॉग इन आयडीसाठी दोन हजार
गुन्हे शाखेने याप्रकरणी निखिल येलगट्टी, मेल्विन आणि भावेश मोदी या तिघांविरोधात गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली आहे.
निखिल सूर्यप्रकाश यल्लीगेट्टी नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने दोन वेबसाइट तयार केल्या.
या दोन ॲप्लिकेशनपैकी कोणत्याही एका लॉग इन आयडी आणि पासवर्डसाठी प्रति महिना दोन हजार रुपये किंवा सहा महिन्यांचे १२ हजार व वार्षिक २४ हजार रुपये घेतले जात होते. त्या मोबदल्यात सर्व माहिती देत असल्याचे उघड झाले.