अंधेरीत बसून प्रतिबंधित औषधांची अमेरिकेत विक्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 11:20 AM2024-01-15T11:20:49+5:302024-01-15T11:21:08+5:30
अवैध कॉल सेंटरवर कारवाई, गुन्हे शाखेकडून १० जणांना बेड्या
मुंबई : भारतात बंदी असलेल्या औषधांची अमेरिकेतील नागरिकांना विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत अंधेरीतील कॉल सेंटर उद्ध्वस्त करत १० जणांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी साकीब सय्यद (३८), यश शर्मा (२६) यांच्यासह कॉल सेंटरमध्ये काम करणारे उजेर शेख (२६), जुनैद शेख (२२), गौतम महाडिक (२३), जीवन गौडा (२१), मुनीद शेख (४०), हुसैन शेख (२३), विजय कोरी (३८), मोहम्मद सुफीयान मुकादम (२०) यांना अटक केली आहे. यातील शर्मा हा व्यवसायाने वकील असून तेथे विधि सल्लागार म्हणून काम करत होता.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व येथील द समिट बिझनेस बेमधील (ओमकार) तिसऱ्या मजल्यावरील ग्लोबल सर्व्हिसेस येथे अवैध कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे शनिवारी गुन्हे शाखेने या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.
फार्मा कंपन्यांच्या नावाने फोन
कारवाईत साकीब मुस्ताक सय्यद (३८), यश शर्मा (२६) व एका साथीदाराच्या मदतीने अवैध कॉल सेंटर चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यासाठी आठ मुले कॉल सेंटरवर काम करत होती. ते व्हीओआयपी यंत्रणेद्वारे अमेरिकेतील नागरिकांना विविध औषध कंपन्यांच्या नावाने दूरध्वनी करून व्हायग्रा, सियालिस, लिविट्रो व ट्रेमोडोल यासारख्या प्रतिबंधात्मक औषधांची सलमान मोटरवाला या मुंब्रा येथे राहणाऱ्या व्यक्तीमार्फत विक्री करत असल्याचे समोर आले. आरोपींनी केंद्र व राज्य सरकारचा महसूल बुडवून फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा नोंदवत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
सर्व्हर डाऊन
या छाप्यानंतर या प्रकरणातील संशयित इरफान कुरेशी, सलमान मोटरवाला व राशीद अन्सारी यांनी सर्व्हर बंद करून तेथील यंत्रणेतील फाइलही डिलिट करून पुरावे नष्ट केले. याप्रकरणी गुन्हे शाखेने तीन मोबाइल, एक लॅपटॉप, एक सर्व्हर, २४ हार्ड डिस्क, एक राऊटर असा मुद्देमाल जप्त केला आहे. डिलीट फाइल पुन्हा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.