नागपुरात आर्थिक देवाण-घेवाणीतून झाला सेल्स मॅनेजरचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 10:22 PM2019-11-19T22:22:50+5:302019-11-19T22:24:02+5:30
राजाबाक्षा हनुमान मंदिराच्या गल्लीमध्ये सोमवारी रात्री खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन भावांना अटक केली आहे.मृत विजय रमेश खंडाईत हा विजय क्रॉप्स प्रा. लि. कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजाबाक्षा हनुमान मंदिराच्या गल्लीमध्ये सोमवारी रात्री खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन भावांना अटक केली आहे. आरोपींचे नाव यशवंत सीताराम चव्हाण (४७), संजय सीताराम चव्हाण (४४) व दिनेश सीताराम चव्हाण (५१)आहे. मृत विजय रमेश खंडाईत हा विजय क्रॉप्स प्रा. लि. कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होता. विजय आणि आरोपी यशवंत यांची मैत्री होती. आर्थिक देवाणघेवाणीतून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे.
सूत्राच्या मते सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास विजय आपल्या कारने यशवंत चव्हाण याच्यासोबत राजाबाक्षा मंदिराजवळ पोहचला. तिथे आरोपी संजय व दिनेश उपस्थित होते. तिथे आरोपींचा विजय याच्याशी संपत्तीवरून वाद झाला. तिघांनीही मिळून विजयच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून त्याला जागेवर संपविले. त्यानंतर यशवंत चव्हाण हाताला चाकू लागल्याने स्वत:च मेडिकलमध्ये भरती झाला. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपींनीच विजयला त्याच्या गाडीमध्ये मेडिकलमध्ये आणले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र सुरुवातीला चर्चा होती की विजय व यशवंत याच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केला. परंतु पोलिसांनी केलेल्या चौकशीत चव्हाण बंधूचा हत्येत सहभाग असल्याची माहिती मिळाली. इमामवाडा पोलिसांनी मंगळवारी सकाळी सर्व आरोपींना अटक केली. यशवंत व अन्य आरोपी विजयच्या हत्येमागचे नेमके कारण सांगू शकले नाही. परंतु दोघांमध्ये आर्थिक देवाणघेवाण असल्याची माहिती पोलिसांना आहे.
कुटुंबही अनभिज्ञ
विजय खंडाईत याचे कुटुंब मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील आहे. दोन वर्षापूर्वी विजयचा विवाह झाला होता. कुटुंबातील लोकही विजयला कुठल्या कारणांनी मारले याबद्दल अनभिज्ञ आहे. आरोपींनीही या प्रकरणात कुठलाही खुलासा केला नाही.
२२ पर्यंत पीसीआर
आरोपी तिन्ही चव्हाण बंधूला पोलिसांनी अटक करून मंगळवारी न्यायालयापुढे सादर केले. न्यायालयाने आरोपींना २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातूनच या घटनेचे नेमके कारण पुढे येऊ शकते.