लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाल्याने पिस्तुलाची विक्री; पिस्तुलासह काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 01:45 AM2020-10-13T01:45:37+5:302020-10-13T03:02:11+5:30
२१ हजार २०० रुपयांचा हा मुद्देमाल आहे. हे दोघेजण कोणाला पिस्तूल विकण्यासाठी आले होते, याचा तपास सुरू असल्याची माहिती चौधरी यांनी दिली
कल्याण : पिस्तूल आणि काडतूस बाळगल्याप्रकरणी दोघांना खडकपाडा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सुशील भोंडवे (वय २७, रा. इगतपुरी, नाशिक) आणि गौरव खर्डीकर (वय २८, रा. कल्याण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांना कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा, योगीधाम परिसरातून शुक्रवारी अटक करण्यात आली.
दोघे जण पिस्तुलासह गौरीपाडा येथील गुरू आत्मन बिल्डिंगच्या समोर येणार असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना खबऱ्याकडून मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने संबंधित परिसरात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत सुशीलकडे पिस्तूल, तर गौरवकडे चार जिवंत काडतुसे आढळून आली.
२१ हजार २०० रुपयांचा हा मुद्देमाल आहे. हे दोघेजण कोणाला पिस्तूल विकण्यासाठी आले होते, याचा तपास सुरू असल्याची माहिती चौधरी यांनी दिली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे सहा महिने काम नव्हते. या बेरोजगारीमुळे झटपट पैसा कमाविण्यासाठी दोघांनी पिस्तूलविक्री करण्यास सुरुवात केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.