१९९३ बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपी सलीम गाझीचा कराचीमध्ये मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 08:24 PM2022-01-16T20:24:44+5:302022-01-16T20:32:30+5:30
Salim Ghazi died in Karachi : मुंबई पोलिसांच्या सूत्राने रविवारी ही माहिती दिली. तो अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो पाकिस्तानात उपचार घेत होता.
मुंबईतील 1993 बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी आणि कुख्यात गुंड छोटा शकीलचा राईटहॅन्ड आणि दाऊद टोळीचा सदस्य सलीम गाझी याचा शनिवारी कराचीमध्ये मृत्यू झाला. मुंबई पोलिसांच्या सूत्राने रविवारी ही माहिती दिली. तो अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो पाकिस्तानात उपचार घेत होता.
12 मार्च 1993 रोजी मुंबईतील विविध भागात सुमारे दोन तास बॉम्बस्फोट सुरू होते आणि मुंबई या वेगवान शहराचे जनजीवन विस्कळीत झाले होते, हे विशेष. या स्फोटांमध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. त्या स्फोटांमध्ये अनेक आरोपींचा हात होता. अंडरवर्ल्डचे गुंड या बॉम्बस्फोटात आरोपी आहेत. त्यापैकी अबू सालेम, फारुख टकला असे काही लोक पोलिसांच्या ताब्यात आहेत. या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार अबू सालेमसह इतर अनेक गुन्हेगारांनाही विशेष टाडा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे, परंतु या स्फोटांमागील सर्वात मोठे नाव कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम अजूनही भारताच्या कारवाईपासून दूर आहे. दाऊदने हा स्फोट का केला त्यामागेही एक कहाणी आहे. मुंबई बॉम्बस्फोटामागील कारण बाबरी मशीद पाडल्याचे सांगितले जात आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पतन केल्यानंतर मुंबईसह देशभरात दंगली उसळल्या.
The most wanted 1993 serial blast accused Salim Gazi, a member of the Dawood gang and close aide of Chota Shakeel died on Saturday in Karachi, Pakistan: Mumbai Police Sources
— ANI (@ANI) January 16, 2022
वास्तविक, 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात 257 लोक मारले गेले होते, तर 713 गंभीर जखमी झाले होते. या विध्वंसात 27 कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले. या स्फोटांच्या किंकाळ्या देशभर ऐकू गेल्या. देशात या स्फोटामुळे खळबळ माजली. मुंबईतील बॉम्बस्फोट सुनियोजित पद्धतीने करण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा इशारा मिळाल्यानंतर मुंबईतील बॉम्बस्फोटांसाठी सर्वप्रथम लोकांची निवड करण्यात आली. त्यांना दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवून प्रशिक्षण देण्यात आले. तस्करीचे जाळे वापरून दाऊदने अरबी समुद्रमार्गे स्फोटके मुंबईत पोहोचवली होती. हा रक्तरंजित खेळ पार पाडण्यासाठी मुंबईतील ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवायचे होते, त्या सर्व ठिकाणांची रेकी करण्यात आली. शहरातील विविध भागात सुमारे दोन तास हे स्फोट सुरू राहिल्याने संपूर्ण मुंबईचे जनजीवन ठप्प झाले होते. सगळीकडे घबराट आणि दहशत पसरली होती. पहिला स्फोट मुंबई शेअर बाजाराजवळ दुपारी 1.30 वाजता झाला आणि शेवटचा 3.40 वाजता (सी रॉक हॉटेल) येथे झाला होता.