खाकीला सॅल्यूट! "या" कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे वाचले ८८ प्रवाशांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 01:57 PM2020-03-14T13:57:02+5:302020-03-14T13:59:04+5:30
गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून सकाळी 9 वाजता अल फथेह बोट सुटली होती.
मुंबई - अलिबागला निघालेली मांडवा बंदरात आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास अजंठा कंपनीची प्रवासी बोट बुडाली. बोटीमध्ये ८८ प्रवासी प्रवास करत होते. पोलिसांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या बोटीने ८० जणांना वाचवले. तर अन्य ८ जणांना खासगी बोटीने वाचवण्यात यश आले आहे. मात्र, मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या जिगरबाज कामगिरीमुळे ८८ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. प्रशांत घरत यांनी सद्गुरू कृपा बोटीतील दोन खलाश्यांच्या मदतीने ताबडतोब जाऊन बुडणाऱ्या प्रवाशांना वाचविले. त्यामुळे पोलिसासह दोन खलाशी हे त्याच्यासाठी देवदूतच ठरले.
ब्रेकिंग! मांडवा बंदरात प्रवासी बोट बुडाली; सुदैवानं सर्व प्रवासी सुखरुप
गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून सकाळी 9 वाजता अल फथेह बोट सुटली होती. मांडावा बंदरा जवळ 200 मीटर अंतरावर असताना बोट बुडू लागली. बोटीला खाली दगड लागल्याने ही दुर्घटना घडली. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली. मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी सद्गुरू कृपा बोटीसोबत पोलीस नाईक प्रशांत घरत यास तात्काळ पाठवून दिले. बोटीच्या खलाशांनी तातडीने जाऊन प्रशांत घरत यांच्यासोबत जाऊन बुडणाऱ्या ८८ जणांचे प्राण वाचवले आणि त्यांना सुखरूप मांडवा बंदरात सोडले. मात्र, पोलिसाने दाखवलेल्या खबरदारीमुळे जलसमाधी मिळणाऱ्या ८८ जणांचा जीव वाचला. देवदूत बनलेल्या बोटीचे खलाशी आणि पोलीस नाईक घरत यांचे म्हणूनच कौतुक होत आहे.