सॅल्यूट टू मुंबई पोलीस... महिला कॉन्स्टेबल जिजाबाईंमुळे 'ती' परतली सुखरुप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 06:54 PM2018-08-17T18:54:40+5:302018-08-17T21:36:46+5:30
आई टीव्ही पाहण्यास अटकाव करत असल्याने पुण्याची मुलगी मुंबईला पळाली
मुंबई - १५ ऑगस्ट दिवशी सर्वच देशाचा स्वातंत्र दिन साजरा करण्यात व्यग्र होतो. मात्र, आपल्या सुरक्षेसाठी मुंबईपोलिसांनी कंबर कसली होती. कुलाबा पोलिसांची व्हॅन गस्त घालत असताना कुलाबा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल जिजाबाई पवार यांना गेट ऑफ इंडिया येथे एक १७ वर्षाची मुलगी एकटीच फिरताना आढळली. त्यावेळी जिजाबाई सतर्कता दाखविल्याने शुल्लक कारणावरून घरातून पळून मुंबईत आलेल्या मुलीला सुखरूप तिच्या पुण्यातील घरी सोडण्यास कुलाबा पोलिसांना यश आलं आहे.
महिला कॉन्स्टेबल जिजाबाई पवार स्वातंत्र्यदिनाला गेट वे ऑफ इंडियावर गस्त घालत होत्या. यावेळी तिथे एक अल्पवयीन तरुणी एकटीच फिरत असल्याचं त्यांना आढळलं. त्यांनी तरुणीला नाव विचारत तिची चौकशी केली. त्यावेळी तिने आपलं नाव आणि वय सांगत आपण पुण्याची रहिवासी असून खूप वर्षांपूर्वी आई-वडिलांचं निधन झालं असल्याचं सांगितलं. तरुणीच्या उत्तरावर संगीता पवार यांना समाधान झालं नाही. त्यांनी तिला विश्वासात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तिला चहा बिस्कीट देत अजून विचारपूस केली असता तिने खरी माहिती जिजाबाई यांना सांगितली अशी माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर यांनी दिली. आईने टीव्ही पाहण्यावरुन ओरडल्याने नाराज झाले होते. तोच राग मनात ठेवून रागात मी घर सोडले आणि देहू येथून थेट मुंबई गाठली अशी माहिती अल्पवयीन तरुणीने दिली. यानंतर तरुणीकडून तिच्या आई-वडिलांना फोन नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क पोलिसांनी संपर्क साधला. त्यांच्याकडून योग्य ते पुरावे मिळाल्यानंतरच त्यांना मुलीचा ताबा देण्यात आले असे पुढे धोपावकर म्हणाले. वेळीच प्रसंगावधान दाखवत मुलीला सुखरुप तिच्या पालकांकडे सोपवल्याबद्दल पोलीस कॉन्स्टेबल जिजाबाई पवार यांना सन्मानित करून बक्षीस देण्यात यावे यासाठी वरिष्ठांकडे शिफारस करण्यात आली असल्याची माहिती धोपावकर यांनी दिली. ही तरुणी अल्पवयीन असल्याने परिस्थिती गंभीर होण्याची भीती होती. मात्र जिजाबाई यांनी कर्तव्यावर असताना योग्य सतर्कता आणि प्रसंगावधान दाखविल्याने मुंबई पोलिसांची मान जरूर उंचावली आहे.