सीबीआय चौकशीला समीर वानखेडेंची दांडी; नवीन समन्स अद्याप जारी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 09:13 AM2023-05-25T09:13:21+5:302023-05-25T09:13:43+5:30
गेल्या शनिवार व रविवारी त्यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कॉर्डिलिया क्रूझवरील छापेमारीदरम्यान अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अटक न करण्यासाठी २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप असलेले एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे हे बुधवारी सीबीआय चौकशीसाठी अनुपस्थित राहिले.
गेल्या शनिवार व रविवारी त्यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे आपण चौकशीला उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी सीबीआयला कळविले. वानखेडे यांना पुढील तारखेचे समन्स सीबीआयने अद्याप जारी केलेले नाही. आर्यन खान प्रकरणानंतर वानखेडे व त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांची एनसीबीने विभागीय चौकशी केली होती. त्या अहवालात त्यांच्यावर ठेवलेल्या ठपक्याच्या आधारे सीबीआयने ११ मे रोजी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
सीबीआयला ३ जूनपर्यंत अहवाल द्यावा लागणार
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वानखेडे यांनी प्रथम दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्या न्यायालयाच्या निर्देशांनंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने वानखेडे यांना सर्वप्रथम २२ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. त्यानंतर २२ मे रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान वानखेडे यांना आता ८ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. तर, या प्रकरणी ३ जूनपर्यंत सीबीआयने अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.