Sameer Wankhede, Aryan Khan Drug Extortion case: समीर वानखेडे सुटले? आर्यन खान प्रकरणी वसुलीचा पुरावा सापडला नाही; मुंबई पोलीस हताश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 07:41 PM2021-12-22T19:41:45+5:302021-12-22T19:42:26+5:30
Sameer Wankhede, Aryan Khan Drug Extortion case: आर्यन खान केसमध्ये त्याची सुटका करण्यासाठी 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यापैकी 18 कोटींची डील ठरल्याचा आरोप प्रभाकर साईल या पंचाने केला होता. यावर मुंबई पोलिसांनी चौकशी समिती नेमली होती.
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबईतून एनसीबीने एका क्रूझवरून ताब्यात घेतले होते. या क्रूझ ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप एका एनसीबीच्या पंचाने केला होता. परंतू त्या आरोपांचे पुरावेच मुंबई पोलिसांना मिळाले नसल्याचे समोर आले आहे. यामुळे 31 डिसेंबरला एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक म्हणून समीर वानखेडेंचा कार्यकाळ सुखासुखी संपणार असल्याची चिन्हे आहेत.
1 ऑक्टोबरला आर्यन खान त्याचा मित्र अरबाझ मर्चंट आणि अभिनेत्री मुनमुन धमेचा यांना क्रूझ पार्टीतून ताब्यात घेण्यात आले होते. महिनाभर या प्रकरणाने धुरळा उडविला होता. या कारवाईमुळे समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. नंतर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर खोट्या जात प्रमाणपत्राचे आरोप केले आहेत. महिनाभर हा मुद्दादेखील गाजला होता.
मुंबई पोलिसांनी खंडणी प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली होती. एएनआय वृत्तसंस्थेला पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान वसुली प्रकरणी कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. पुढील आदेश येईपर्यंत कथित वसुलीच्या आरोपांची चौकशी थांबविण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी 20 जणांची चौकशी केली आहे, मात्र काही पुरावा सापडलेला नाही. यामुळे गुन्हादेखील दाखल करत आलेला नाही, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
Investigation of alleged extortion matter in connection with drugs on cruise case halted until next order. Mumbai Police had constituted SET (Special Enquiry Team) to investigate & had questioned around 20 people. No case registered so far as no evidence found yet: Mumbai Police
— ANI (@ANI) December 22, 2021
काय होते प्रकरण...
आर्यन खान केसमध्ये त्याची सुटका करण्यासाठी 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यापैकी 18 कोटींची डील ठरल्याचा आरोप प्रभाकर साईल या पंचाने केला होता. शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानी हिच्याकडे हे पैसे मागितले गेले होते. यानंतर सॅम डिसुझा नावाच्या एका व्यक्तीने दावा केलेला की किरण गोसावी, सॅम आणि पुजा ददलानी भेटले होते. या रकमेपैकी 50 लाख रुपये ददलानीने दिले होते. मुंबई पोलीस हे तिघे भेटले त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत होते.