Sameer Wankhede : समीर वानखेडे यांनी केला लाचेच्या आरोपाचा इन्कार; एनसीबी करणार चौकशी, पंच प्रभाकर साईल यांचीही तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 06:48 AM2021-10-26T06:48:08+5:302021-10-26T06:48:43+5:30
Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्यावर लाचेचा आरोप केल्याने त्याची अंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. वानखेडे उद्या दिल्लीत जाणार आहेत.
नवी दिल्ली : आर्यन खानला अटक प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाचेचा आरोप केल्याने त्याची अंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. वानखेडे उद्या दिल्लीत जाणार आहेत. एनसीबीच्या उत्तर विभागाचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह चौकशी करतील. आपल्याकडून दहा कोऱ्या कागदांवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सह्या घेतल्याचा दावाही साईल यांनी केला.
शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये लाच मागण्यात आली. त्यातील ८ कोटी रुपये वानखेडे यांना मिळणार होते, असा आरोप साईल यांनी केला. संबंधित चित्रफीत व प्रतिज्ञापत्र समोर आल्यानंतर वानखेडे यांनी आरोप फेटाळले. मात्र एनसीबीने ज्ञानेश्वर सिंह यांना चौकशी करण्यास सांगितले. सिंह म्हणाले की, संबंधित कागदपत्रे मला मिळाली आहेत. त्या आरोपांची चौकशी पारदर्शक असेल. साईल यांचीही एनसीबीचे अधिकारी चौकशी करण्याची शक्यता आहे.
बोगस प्रमाणपत्राद्वारे नोकरी : मलिक
नांदेड : समीर वानखेडे यांचे मूळ नाव हे समीर दाऊद वानखेडे आहे. त्यांनी स्वत:ला एससी असल्याचे दाखवून शासकीय नोकरीसाठी त्याचा लाभ उठविला. आता बोगस केसेस करीत सुटले आहेत,असा गौप्यस्फोट अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी येथे केला.
समीर यांच्या वडिलांनी धर्मांतर करून लग्न केले; परंतु हे धर्मांतर लपून ठेवले. सरकारी नोकरीच्या ठिकाणीही त्यांनी कुटुंबाबाबत पुरावा दिला नाही. समीर यांनीही बोगस सर्टिफिकेटच्या आधारावर नोकरी मिळवली. त्यांच्या जागी एखादा मागासवर्गीय अधिकारी झाला असता, असे ते म्हणाले.
मनाई आदेश देण्यास विशेष कोर्टाचा नकार
वानखेडे यांच्यावर आरोप करणारे पंच प्रभाकर साईल यांच्या प्रतिज्ञापत्राची दखल घेऊ नये ही विनंती विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळली. हा वानखेडे व एनसीबीला मोठा झटका आहे.